खंडाळ्याजवळ रात्रीच्यावेळी गाडी थांबवून यशवंतराव म्हणाले, धोंडीराम चल माझ्यासोबत!

दिवंगत नेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची रविवारी (ता. 25) पुण्यतिथी. त्यानिमित्ताने एक आठवण.
खंडाळ्याजवळ रात्रीच्यावेळी गाडी थांबवून यशवंतराव म्हणाले, धोंडीराम चल माझ्यासोबत!

वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी सांगितलेली गोष्ट आहे.
ते एकदा मोटरसायकलीवरून पुण्याला येत होते. वेळ रात्रीची होती. पारगाव खंडाळा गावाजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला उभे राहिले. तेवढयात एक लाल दिव्याची गाडा आणि पोलिस गाडी त्यांच्या जवळून गेली.

काही क्षणातच ती गाडी पुढे जावून थांबली. त्या गाडीतून उतरले यशवंतराव चव्हाण. त्यांनी जोरात हाक मारली, धोंडीराम...
धोंडीरामही हाक मारायच्या अगोदर साहेबांना पाहून त्यांच्याकडे निघाले होतेच.

'हिकडं इतक्या रात्री कसा आलायस ? 
साहेबांनी विचारलं
साहेब पुण्याला निघालोय.

'मग इथ कुठं मधेच उतरलास? चल माझ्यासोबत.

'साहेब माझी गाडी हाय कि म्हणत धोंडीरामनं अंधारात उभ्या असलेल्या मोटरसायकलीकडं बोट केलं.

ते पाहून साहेब चिडले. 'धोंडीराम तू मोटरसायकलीवरून पुण्याला निघाला आहे आणि सहजपणे सांगतो आहेस.'
साहेब धोंडीराम यांच्याशी रागाने बोलायला लागले. धोंडीराम काही न बोलता त्यांची बोलणी खावू लागले. या दोघातील संवाद पोलिस,इतर अधिकारी ऐकत उभे होते. 

मग साहेबच म्हणाले, 'अरे धोंडीराम तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज आहे. का असा वेड्यासारखा वागत आहेस ?. तुला खूप जगायचं आहे रे, खूप काम करायचे आहे.' 

साहेबांचं प्रेम पाहून धोंडीराम मोहिते गहिवरले. म्हणाले, 'साहेब आता न्हाय असं वागणार .' मग साहेबांनी त्याला समजावलं. पुढं धोंडीरामनी इतक्या दूरचा प्रवास कधीही मोटरसायकलनं केला नाही. त्यांनी साहेबांना दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळलं.

साहेबांचं आजोळ देवराष्ट्रे आणि धोंडीराम हे या गावच्या शिवथडीचे वडगावचे. पुढे हेच धोंडीराम मोहिते पत्रकारितेत धो. म. मोहिते या नावाने फेमस झाले. मुलाखतीच्या मैदानात हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्या पुस्तकाला साहेबांनी प्रस्तावना दिली. मोहिते यांनी सागरेश्वर अभयारण्य उभे केले. या विधायक कार्यकर्त्याला चव्हाण साहेबांनी अगोदरच ओळखले होते. असे लोक साहेबांनी हेरले त्यांना घडवले त्यांच्यावर खूप प्रेम केले. त्यांची काळजी घेतली. अगदी त्यांनी प्रवास कसा करावा, याचीही चिंता साहेब करायचे. 

रात्रीच्या अंधारातही आपल्या कार्यकर्त्याला ओळखणारे साहेब, त्याची विचारपूस करणारे साहेब, लोकांचे अश्रू पुसणारा आणि लढण्याची वेळ आल्यावर हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा हा कणखर नेता आजही लाखो लोकांच्या काळजात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com