कल्याणमध्ये अभिवादन मिरवणुकीवरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कल्याण पश्चिम परिसरातील मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी विरुद्ध विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार असा सरळ सामना यानिमित्ताने दिसत आहे.
कल्याणमध्ये अभिवादन मिरवणुकीवरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण

कल्याण : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कल्याण पश्चिम परिसरातील  मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी विरुद्ध विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार असा सरळ सामना यानिमित्ताने दिसत आहे.

शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यानंतर अवघ्या काही तासातच सेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांनी फेसबुकच्या माध्यमातून मिरवणूक रद्द केल्याच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांच्या या निषेधावर प्रतिक्रिया देत काही शिवसैनिकांनी ही मिरवणूक निघालीच पाहिजे असा आग्रह केला आहे.  2013 पासून सलग पाच वर्ष 23 जानेवारी रोजी शहरभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे.  24 जानेवारी रोजी कल्याण शहर शाखेतर्फे अभिवादन यात्रा काढण्यात येत असे.  ही यात्रा म्हणजे एक प्रकारे शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन म्हंटले तरी चुकीचे ठरू नये.

मात्र, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी 23 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असले तरी अभिवादन यात्रा निघणार नसल्याचे जाहीर केले आहे. ही अभिवादन यात्रा रद्द करण्याच्या निर्णयात भोईर यांना सेनेतील आजी-माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. यातील काही  नेतेमंडळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे मानले जात आहे.  2014 मधील निवडणुकीत मातोश्रीने विजय साळवी यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर करत इतर कोणत्याही नावांचा विचार केला नव्हता. याचा सल प्रत्येकाच्या मनात आजही कायम आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी साळवी यांनी आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात रस नाही असे सांगत आपण विधानसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. याहीवेळी आगामी निवडणुकीसाठी आपण इच्छुक नाही असे  साळवींनी अनेकांजवळ बोलून दाखवले आहे. मात्र ऐनवेळी पक्षनेतृत्व त्यांना संधी देऊ शकते म्हणूनच सेनेच्या सर्व इच्छुकांनी एक गट केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यासह रवी पाटील, अरविंद मोरे, प्रकाश पेणकर विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक मानले जातात. विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेवर नजर ठेवत मागील वर्षी पक्षाकडून महापौर पदाची देण्यात आलेली 'ऑफर' नाकारली होती त्याचबरोबर सभापतीपदासाठी विचार न झाल्याने त्यांचे बंधू जयवंत भोईर यांनी स्थायी समिती सदस्य पदही सोडले आहे. राजकारणामध्ये केलेल्या त्यागाचा विधानसभा उमेदवारीत उमेदवारीसाठी गुंतवणूक म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष असलेले रवी पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा वापर करत पालिकेकडून अनेक बिल्डर धार्जिणे निर्णय करून घेतल्याचे बोलले जाते. याच बरोबर नुकत्याच पार पडलेल्या महानगर साहित्य संमेलनातही पाटील यांनी स्वागताध्यक्ष पदावर पद स्वीकारत शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा मोर्चाच्या आंदोलनातील अरविंद मोरे यांचा सहभाग त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूरक ठरावा. शहरभरात पसरलेल्या रिक्षा युनियनच्या माध्यमातून प्रकाश पेणकर आपल्या राजकीय निशाणा साधण्यासाठी तयारी करत आहेत. ही सर्व मंडळी आपापल्या उमेदवारीसाठी जरी प्रयत्नशील असले तरी वेळ पडल्यास विजय साळवी यांना उमेदवारी मिळू नये यासाठी हे सर्व एकत्र येण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे या सर्वांबाबत काय निर्णय घेतात हा औत्सुक्याचा विषय आहे. अभिवादन यात्रा रद्द केल्यामुळे शिंदे यांना भोईर यांची पाठराखण करणे कितपत शक्य आहे याबाबत शिवसैनिकांमध्ये ही जोरदार चर्चा आहे. मात्र इतका मोठा निर्णय पक्षनेतृत्वाला विचारल्याशिवाय घेतला गेला असेल का असेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com