शिवसेनेचे दुर्लक्ष पण मनसे डोंबिवलीकर महिलांच्या मदतीला

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आणि पालिका प्रशासन मूलभूत सोयीसुविधांच्या विषयात टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. मूलभूत सोयी सुविधा हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीने स्थानिकांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. - मंदा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी
MNS-Raj.jpg
MNS-Raj.jpg

कल्याण :  राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या डोंबिवली शहरालगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील निवासी परिसरातील सार्वजनिक सोयी-सुविधांकडे सरकारी यंत्रणांचे साफ दुर्लक्ष होत असल्याने प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा स्थानिक महिला रहिवाशांनी निर्धार केला आहे.

येणारे वर्ष निवडणूक वर्ष असल्याने सर्व पक्ष याकडे प्राधान्याने लक्ष देतील अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्याकडे या गैरसोयींची तक्रार केल्यानंतरही पालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी रहिवाशांच्या ताकास तूर लागू देत  नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र याचा योग्य तो लाभ उठवत स्थानिक महिलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. 

         मागील दहा वर्षांपासून औद्योगिक निवासी विभागात रस्त्यांची कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत. पाणीपुरवठ्यात ही कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. कचरा तसेच आरोग्य समस्या ही या परिसरात जैसे थे आहेत. यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी स्थानिक रहिवाशांनी वारंवार कल्याण-डोंबिवली पालिका तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.

 पालिका क्षेत्रात येऊन तीन वर्ष झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने लोकप्रतिनिधींकडे ही हा विषय मांडण्यात आला. परंतु आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. अखेरचा उपाय म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर टॅग करून त्यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यातही अपयशच हाती लागले. 

त्यामुळे लोकशाहीतील अस्त्र उगारत येथील रहिवाशांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा दिला  आला आहे. 27 गावातील नागरिकांसाठी सरकारकडून वेगवेगळ्या अनुदानामार्फत विकास योजना घोषित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा केल्या गेलेल्या नाहीत. 

  हा परिसर महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्यानंतर येथील रस्त्यांची तसेच इतर सोयी सुविधांची जबाबदारी पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित झाली. परंतु पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत या परिसरातील रस्त्यांची कामे करण्यात आलेली नाहीत.

 किंबहुना मागील वीस वर्षात या ठिकाणी रस्त्यांवर 'पॅचेस' मारण्यापलीकडे कोणतेही काम न झाल्याने डोंबिवली शहरालगत असूनही या भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. परिसरात धुळीचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 

या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील महिलांनी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने या महिलांना उपोषणास पाठिंबा दिला आहे. आज या महिलांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाची माहिती घेण्यासाठी औद्योगिक मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

 परंतु हे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित झाले असल्याने तेथील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांची असल्याचे उत्तर देत त्यांची बोळवण करण्यात आली. दरम्यान पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रस्ते सुस्थितीत हस्तांतरीत करावे असे पत्र पालिकेने मंडळाला पाठवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com