आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे `मनसे'त गेल्याची अफवा!

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे `मनसे'त गेल्याची अफवा!

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मनसेमध्ये जात असल्याचा आफवांनी मंगळवारी मोठ्या चर्चेला उधाण आले होते. फेसबुक, ट्विटर आणि सोशल माध्यमांमध्ये त्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती.
 
या घटनेची शहानिशा करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी रात्री उशीरापर्यंत आनंदमठ येथे धाव घेऊन दिघे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिघे यांच्या विरोधकांनीच या विषयीच्या आफवा पसरवल्या असल्याचे समोर आले आहे. 

दिघे दहा वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रीय असून कोणत्याही पदाची अथवा तिकिटाची मागणी केली नसल्याचे दिघे यांनी स्पष्ट केले आहे. शहरामध्ये सक्रीय झाल्यामुळे विरोधकांकडून बदनामीचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे. 

ठाण्यातील शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असलेल्या आनंद दिघे यांनी ठाणे शहरामध्ये शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेत असली तरी शहराच्या आमदारपदी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नाही. यामुळे अस्वस्थ केदार दिघे यांनी युवा नेते पदाचा राजीनामा देऊन शहरामध्ये सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे विरोधक कार्यरत झाले असून दिघे मनसे प्रवेश करत असल्याच्या आफवा सोशल माध्यमांमध्ये पसरवण्यास सुरूवात केली आहे. 

परंतु दिघे यांनी या सगळ्याचा इन्कार करत गेली दहा वर्षांपासून आपण शिवसेनेत सक्रीय आहोत, असे स्पष्ट केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गेली सहा वर्षे ठाणे ग्रामीण भागामध्ये कार्य करीत असून आपल्या कार्यकाळात 300 हुन अधिक युवासेनेच्या शाखांची स्थापना झाली. दहा हजाराहून अधिक कट्टर युवासैनिकांची फौज तयार करण्यात आली आहे. 

ठाणे ग्रामीण भागात यशस्वी वाटचाल केल्यावर त्यांनी युवासेनेच्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या काकांच्या कर्मभूमीत म्हणजेच ठाणे शहरामध्ये कार्यरत होण्याचे ठरविले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चाही केली आहे, असे दिघे यांनी सांगितले. 

विघ्नसंतोषींविरोधात सायबर सेलकडे तक्रार करणार
विघ्नसंतोषींविरोधात सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे सांगून केदार दिघे म्हणाले, की आनंद दिघे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत "ठाण्याची शिवसेना व शिवसेनेचे ठाणे" हा एकच मंत्र जपला होता. आजही लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले , पीडित व अन्याय ग्रस्तांच्या हजारो कुटुंबाना आपले कुटुंब मानणारे व बाळासाहेब व माँसाहेबांचे मानसपुत्र अशा उपाधीची "श्रीमंती" लाभलेले माझ्या काकांचे संस्कार माझ्यावर झाले असून शिवसेना हा पक्ष माझ्यासाठी माझे कुटुंबच आहे. मी ठाणे शहरात सक्रिय झाल्यावर अनेक विघ्नसंतोषी माणसांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनीच माझ्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कारस्थान केलेले आहे. 

ज्या ठाणे शहरातून धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती, त्याच शहरामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहणार आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून ही बातमी खोटी आहे व ही खोटी बातमी पसरविण्याऱ्या समाजकंटकांविरुद्ध मी सायबरसेल कडे तक्रार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com