akola News : राज्यातील महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या घटक पक्षानेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांपाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटानेच पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली.
महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचीच शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. एकीकडे राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र असतांना दुसरीकडे मात्र पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आल्याने चर्चा होऊ लागली आहे.
त्याचं झालं असं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल अपशब्द काढल्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाने उडी घेत थेट जितेंद्र आव्हाड यांची पोलिसांत तक्रार दिली आहे. अकोला शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनला ही तक्रार दिली आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आता जितेंद्र आव्हाडांना (Jitendra avahad) प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असेच दिसत आहे.
जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपसह (bjp) सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाली आहेत, असे असतांना या वादात आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या विरोधात अपशब्द काढल्याबद्दल आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
प्रभू श्रीराम यांच्या बद्दल आमच्या मनात आदर असून त्यांच्या विषयी तीव्र भावना आहेत. अशावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमच्यासह संपूर्ण हिंदू धर्माविषयी अभिमान बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तातडीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
दरम्यान, एकीकडे राज्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विरोधी पक्ष उभे ठाकली आहेत. तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेला शिवसेना ठाकरे गट हा ही आव्हाडांच्या विरोधात गेल्याच या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी दिवसात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आव्हाड यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देताना शिवसेना ठाकरे गटाचे नितीन मिश्रा, गजानन बोराळे, सुरेंद्र विसपुते, नितीन ताकवाले, योगेश गिते, देवा गावंडे, राजेश इंगळे, रुपेश ढोरे, गणेश बुंदेले, विजय तिखीले, रमेश पांडे, संजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
(Edited by Sachin Waghmare)