

अकोला : ''भीमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचारामागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदु आघाडीचे मिलींद एकबोटे यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले असतांनाही हिंसाचारास त्यांना जबाबदार न धरता मराठा समाजाच्या संघटना जबाबदार असल्याचे धक्कादायक विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा हे मराठा-बहुजन समाजाचे द्वेष करणारे असल्याने त्यांना खुष करण्यासाठीच रामदास आठवले हे मराठा समाजाची बदनामी करीत आहेत," असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना ढोणे म्हणाले, "भीमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचारामागे संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत व त्यामुळेच पोलिसांनी त्यांचेवर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. परंतु सरकारच्या दबावामुळे त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. संभाजी भिडे व मिलींद एकबोटे हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत आहेत. हे दोघेही मनुवादी वृत्तीचे असून समाजात फुट पाडण्याचे कटकारस्थान ते अनेक वर्षापासून करीत आहेत. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली येथील एका बैठकीत महात्मा फुले हे क्रमांक एकचे देशद्रोही-धर्मद्रोही असल्याचे विखारी उद्गार काढले होते. सनातन प्रभात या संघपरीवाराशी संबंधीत दैनिकाने ते प्रकाशित केले होते. छत्रपती शिवराय व जिजाऊंची बदनामी करणार्या ज्या भांडारकर संस्थेविरोधात आंदोलन करू अशी विनंती सत्यजित घाडगे यांनी संभाजी भिडे यांना केल्यानंतर त्यांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकत्र्यांकरवी घाडगे यांना जबर मारहाण केली होती. यावरून संभाजी भिडे यांना छत्रपती शिवराय व जिजाऊंपेक्षा भांडारकर संस्था जवळची वाटली. मात्र जनतेत स्वत:ला शिवरायांचा भक्त दाखविण्याचे ढोंग संभाजी भिडे करतात.''
ते पुढे म्हणाले, ''संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक न करता सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या दोघांना वाचविण्यासाठी भाजप सरकार हिंसाचाराची जबाबदारी मराठा समाजावर टाकण्याचे कारस्थान रचत आहे.'' आता रामदास आठवले यांच्या माध्यमातून भाजप मराठा समाजाची बदनामी करीत असल्याचा आरोपही डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
''आरएसएस व भाजपा हे दोन्ही मराठा-बहुजन समाजाच्या विरोधात असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. भाजपाची सत्ता येताच न्यायालयाच्या माध्यमातून मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. शिवाजी महाराज व जिजाऊ यांचे चारित्र्यहनन करणारी माहिती जेम्स लेनला देणारे व त्याच्या पुस्तकाची प्रशंसा करणारे बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास राज्यात तीव्र विरोध झाल्यानंतरही भाजपाने त्यांच्या पाठिशी उभे राहून शिवराय व जिजाऊंच्या समस्त भक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. भांडारकर संस्थेने शिवराय व जिजाऊंची बदनामी केल्यानंतरही त्यांचा साधा निषेधही भाजपने केला नाही. यावरून भाजपा हा मराठा समाजाचा विरोध करणारा पक्ष असल्याचे सिध्द झाले आहे व त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला खुष करण्यासाठीच रामदास आठवले मराठा समाजाची बदनामी करीत आहेत." असाही आरोप ढोणे यांनी केला.
रामदास आठवले हे कोणतीही निवडणुक न जिंकता केवळ भाजपाच्या आशिर्वादानेच आज केंद्रात मंत्रीपदावर आहेत. आपले मंत्रीपद टिकविण्यासाठी व भविष्यात बढती मिळावी यासाठीच रामदास आठवले हे समाजात फुट पाडण्याचे वक्तव्य करीत आहेत. भाजपालाही राज्यातील चार कोटी मराठा समाजापेक्षा मिलींद एकबोटे व संभाजी भिडे ह्या दोन व्यक्ती जवळच्या वाटत असल्याचा आरोपही डॉ. सुधीर ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अविनाश नाकट, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे, अखील भारतीय कुणबी युवा मंचचे अध्यक्ष माणिक शेळके, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा इंदुताई देशमुख उपस्थीत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.