काँग्रेसचे गटा-तटाचे राजकारण पडणार भाजपच्या पथ्यावर?

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना काँग्रेस अद्यापही उमेदवाराचा निर्णय करु शकलेली नाही. प्रदेशाध्यक्षांनी गटबाजीला लगाम लावण्याची सूचना केली, असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत लाथाळी संपत नसल्याने उमेदवाराच्या नावावर अद्यापही एकमत होऊ शकले नाही. परिणामी या निवडणुकीत भाजपच्या प्रविण पोटे पाटील यांना 'वाॅक ओव्हर’ मिळण्याची शक्यता बळावली आहे.
काँग्रेसचे गटा-तटाचे राजकारण पडणार भाजपच्या पथ्यावर?
Published on
Updated on

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना काँग्रेस अद्यापही उमेदवाराचा निर्णय करु शकलेली नाही. प्रदेशाध्यक्षांनी गटबाजीला लगाम लावण्याची सूचना केली, असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत लाथाळी संपत नसल्याने उमेदवाराच्या नावावर अद्यापही एकमत होऊ शकले नाही. परिणामी या निवडणुकीत भाजपच्या प्रविण पोटे पाटील यांना 'वाॅक ओव्हर’ मिळण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान महापालिकेतील काँग्रेसचे स्विकृत सदस्य अनिल माधोगडीया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जाेरात सुरू झाली आहे. भाजपने राज्यमंत्री प्रवीण पोटे यांची उमेदवारी जाहीर करून अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस शिवाय दुसरा पक्ष रिंगणात नसल्याने या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची प्रतिक्षा आहे. गुरूवार (ता.तीन) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार अद्यापही निश्चित होऊ शकला नाही. काँग्रेसमध्ये सध्या महापालिकेतील स्विकृत सदस्य अनिल माधोगडीया, जिल्हा परिषदेच्या सदस्या वासंती मंगरोळे व नाशिकचे उद्योजक शरद निकम यांची नाव या स्पर्धेत असतांना यवतमाळचे सुमित बाजोरिया यांचेही नाव समोर आल्याने नेमके कोण? यावरुन संभ्रम वाढला अाहे. अशातच माधोगडिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत अापला दावा बुलंद केला अाहे. 

माधोगडिया हे माजी आमदार देविसिंह शेखावत यांचे समर्थक असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा त्यांना आशिर्वाद आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व आमदार विरेंद्र जगताप हे मात्र या नावासाठी अनुकूल नाहीत. या दोन्ही नेत्यांनी जिल्हा परिषद सदस्या वासंती मंगरोळे यांचे नाव रेटल्याचे सांगितले जात आहे. नाशिकचे शरद निकम या नावासही त्यांनी विरोध दर्शविलेला नाही. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची शहर व ग्रामीण अशा दोन गटात विभागणी झाली आहे. ग्रामीण मध्ये आमदार यशोमती ठाकूर यांचा गट वेगळा असून त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचा देशमुख -जगताप गटाशी सलोखा नाही. या निवडणुकीत प्रदेश महासचिव संजय खोडके शांत आहेत. 

या निवडणुकीत पक्षीय संख्याबळ पाहल्यास भाजप मजबूत आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक 245 चे संख्याबळ जमविणे त्यांना अवघड नाही. स्वपक्षाचे व सेनेचे मिळून 22८ मतदार जवळ आहेत. संख्याबळ मिळवण्यात प्रविण पाेटे पाटील तरबेज आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेस निवडून येण्याच्या स्थितीत असतानाही त्यांनी बबलू देशमुखांना मात देत विजय मिळवला. काँग्रेसची स्थिती यावेळी नाजूक असताना उमेदवार अजूनही निश्चित नाही. जिल्हा काँग्रेस मध्ये अंतर्गत गटबाजीचा लाभ भाजपला मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपला 'वाॅक ओव्हर' मिळतो कि काय अशी स्थिती सध्या आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com