अकोला : जिल्हा परिषद पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. यानंतर कुरबुरींना सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील कुटासा या गावात प्रचारादरम्यान काय झाले, ही बाब आता चव्हाट्यावर आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांतील कुरबूर चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कुटासा जिल्हा परिषद गटात भाजपसोबत हातमिळविणी केल्याचा आरोप केला, असून यासंदर्भात ते थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
आमदार अमोल मिटकरी यांचे गाव कुटासार हे आहे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथेच ‘दादा पेक्षा नाना मोठा’, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात कुटासातील निवडणूक चांगलीच गाजली. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. आज मतदान झाले. यादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपशी हातमिळविणी करण्याचा थेट आरोप लावत निशाणा साधला. महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते.
शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत हातमिळवणी करण्याची अपेक्षा नव्हती, असे आमदार मिटकरी म्हणाले. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर या प्रकाराची गंभीर दखल घेतली जावी, अशी अपेक्षा आहे. विकास महर्षी असलेल्या पालमकंत्री बच्चू कडूंच्या डोळ्यांत कुणी धुळ फेकत असेल किंवा भविष्य बघून ‘मोदी है तो सब मुमकिन है’ असे समजून बच्चू कडूच महाविकास आघाडीच्या डोळ्यात धुळफेक करीत असतील, असा आरोपही त्यांनी लावला.
नेमके घडले काय?
जिल्हा परिषद कुटासा गटातील उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची कुटासा येथे भाजपचे पदाधिकारी विजयसिंह सोळंके यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत सोळंके यांनी भाषणही दिले होते. यावरून प्रहारने निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी केल्याची चर्चा रंगली आहे.
पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार राज्यमंत्र्यांवर भलते सलते आरोप करीत आहेत. प्रचारादरम्यान कुणीही कुणाच्या घरी जाऊ शकते. त्याला हातमिळवणी किंवा युतीचे नाव देता येत नाही. भाजप, राष्ट्रवादी, प्रहारचे स्वतंत्र उमेदवार होते. कुणी कुणाशी हात मिळवणी केली, हे बुधवारी निकालावरून स्पष्ट होईलच.
- ॲड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, अकोला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.