ठाणे

पवारांच्या उपस्थितीसाठी लग्न दोन वर्षे पुढे ढकलणारे आमदार बरोरा झाले शिवसैनिक!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीसाठी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या मुलाचे व मुलीचे लग्न दोन वर्षे पुढे ढकलले होते. त्याच बरोरांनी पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामाही विधानसभा अध्यक्षांकडे दिला.

बरोरा यांना मुलगी नेहा व मुलगा निखिल आहे. निखिल हे ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आहेत. पवार हे बरोरा यांचे श्रद्धास्थान. बरोरा कुटुंब हे 1980 पासून पवार यांचे नेतृत्त्व मानणारे होते. या दोघांच्या लग्नासाठी पवार यांनी यावे, यासाठी थोडेथिडके दिवस नाही तर तब्बल दोन वर्षे लग्न पुढे ढकलले होते.  

पवार यांच्या लग्नाच्या उपस्थितीसाठी तारीख मिळविण्यासाठी पवार यांच्या पीएकडे चकरा मारत होते. पण तारीख मिळत नव्हती. नंतर ते स्वतः पवार यांना भेटले. पवार यांनी 22 डिसेंबर 2018 ही तारीख दिली. बरोरा यांनी कोणताही मूहूर्त न पाहता तीच लग्नाची तारीख ठरवून टाकली. 

काही महत्त्वाचे काम निघाल्याने पवार या लग्नाला येऊ शकले नाहीत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर नेत्यांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. शरद पवार न आल्याने बरोरा नाराज झाले होते. पण राज्यातील इतर दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

पवार यांना श्रद्धास्थान मानणारे बरोरा आता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. त्यांनी शिंदे यांच्यासोबतच विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन आपल्या पदाची राजीनामा दिला. त्यांची शिवसेनेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तरीही स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात आतापसूनच पवित्रा घेतला आहे.  बरोरा यांचा उद्या (बुधवारी, ता. 10 जुलै) प्रवेश होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT