भिवंडी : भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांविरोधात नवी मुंबईतील कोकण आयुक्तांकडे पदरद्दतेसाठी अर्ज करण्यात आला आहे. याबाबत कोकण आयुक्तांनी सुनावणी घेतली असता, कागदपत्रांची पूर्तता अद्याप झाली नाही, त्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी फुटीर गटातील नगरसेवकांच्या वतीने वकिलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी आता 18 फेब्रुवारीला सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भिवंडीत कॉंग्रेसमधील गटबाजी अधिकच उफाळून आली असून, बनावट पक्षादेशप्रकरणी एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
भिवंडी महापालिकेत शिवसेना व कॉंग्रेसची युती आहे. पालिकेत कॉंग्रेसचे 47 व शिवसेनेचे 12 नगरसेवक असल्याने बहुमत आहे. असे असताना महापौर व उपमहापौर पदासाठी 5 डिसेंबर 2019 ला झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवारास मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. कॉंग्रेसचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती.
आयुक्तांच्या आदेशावरून भिवंडी पालिकेच्या नगरसचिव विभागाने कॉंग्रेस पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या 18 नगरसेवकांना नोटीस बजावली होती. दरम्यान, कोकण विभाग कार्यालयात गुरुवारी (ता. 30) उपमहापौर इम्रान खान यांच्यासह काही नगरसेवक हजर झाले होते. त्यांचे मत कोकण आयुक्त शिवाजी दौड यांनी ऐकून नोंदवून घेतले. मात्र कागदपत्रे तपासणीसाठी वेळ हवा आहे, त्यासाठी कालावधी द्यावा, अशी मागणी वकीलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकून घेत सदर नगरसेवकांना मंगळवारी, 18 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.