Cheques fount at Thane Corporation Gate
Cheques fount at Thane Corporation Gate 
ठाणे

ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सापडले लाखोंचे धनादेश

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मागील प्रवेशद्वारावर तब्बल 32 लाख 80 हजारांचे डेप्युटी सिटी इंजिनियरच्या नावे असलेले चार धनादेश खाकी लखोट्यात बेवारस पडलेले आढळल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी (ता. 17) दुपारी पालिकेत कामानिमित्त आलेले कॉंग्रेस पदाधिकारी राहुल पिंगळे यांच्या दृष्टीस हे धनादेश पडल्याने त्यांनी तातडीने हे धनादेश मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांच्यासमक्ष महापौर नरेश म्हस्के यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, हे धनादेश पालिका कार्यशाळा विभागाचे असून निविदा प्रक्रियेसाठी आणले होते. मात्र घाईगडबडीत धनादेशांचा लखोटा गहाळ झाला. सद्यस्थितीत हे धनादेश संबंधित विभागाकडे जमा करण्यात आले आहेत.

सोमवारी दुपारी पिंगळे हे कामानिमित्त महापालिका मुख्यालयात आले होते. पालिकेच्या प्रवेशद्वार क्र. 4 मधून पालिकेत शिरून दुचाकी पार्किंग करताना पिंगळे यांना एक बेवारस खाकी लखोटा जमिनीवर पडलेला दिसला. त्यांनी हा लखोटा उघडून पाहिला असता त्यात चार धनादेश असल्याचे दिसले. प्रत्येकी 8 लाख रक्कमेचे असे तब्बल 32 लाख 80 हजार 450 रुपयांचे हे चार धनादेश असल्याचे समोर आल्याने जबाबदारीने पिंगळे यांनी ते धनादेश मुख्य सुरक्षा रक्षक मच्छिन्द्र थोरवे यांच्या समक्ष महापौर नरेश म्हस्के व उपमहापौर पल्लवी कदम यांच्या स्वाधीन केले.

या चारही धनादेशावर डेप्युटी सिटी इंजिनिअर, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असे लिहलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचे धनादेश डेप्युटी सिटी इंजिनियर यांना कुणी दिले? ठाणे महापालिका डिजिटल झाली असताना अशा प्रकारे धनादेशाद्वारे आर्थिक व्यवहार कसे केले? सदर धनादेश गहाळ झाले की कुणी जाणूनबुजून फेकले? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर, सुरक्षा अधिकाऱ्यांनी या धनादेशाबाबत चौकशी केली असता ठाणे महापालिकेच्या कार्यशाळेशी संबंधित हे धनादेश असल्याचे समोर आले. त्यानुसार, चारही धनादेश संबंधित विभागाचे अधिकारी झांबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT