Jitendra Awhad Sarkarnama
ठाणे

Jitendra Awhad Ram Controversy : आव्हाडांना 'मांसाहार' भोवणार?; ठाण्यात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane Political News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गेल्या आठवड्यात रामाबद्दल एक वक्तव्य केले होते. राम मांसाहार करत होते, असे आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता. आता यावरून ठाण्यात आणखी एक घडामोड घडली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अधिवेशनात राम मांसाहार करायचा, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर भाजपसह (BJP) हिंदुत्वादी संघटनांनी त्यांचा निषेध केला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही सक्रिय होता. आता भाजप प्रदेश उद्योग आघाडी महिलाध्यक्ष सेजल कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार आव्हाडांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने राम मांसाहारी असल्याचे विधान केल्याची तक्रार सेजल कदम यांनी केली आहे. या तक्रारीमुळे आव्हाड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी वरील वक्तव्य केल्यानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच धाव घेत त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली होती. आणि गुन्हा दाखल न केल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करण्याचा इशारा दिला होता.

आता भाजपच्या सेजल कदम यांच्या तक्रारीनंतर आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर तीन वर्षांचा तुरुंगवास

कायद्यानुसार जर एखादी व्यक्तीने वक्तव्य करून किंवा लिखीत स्वरूपात किंवा चिन्हांद्वारे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या तर भारतीय दंड विधानाच्या कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT