ulhasnagar-MNS
ulhasnagar-MNS 
ठाणे

उल्हासनगर महानगरपालिकेसमोर मनसेचा भूखंड प्रश्नी राडा  

दिनेश गोगी

उल्हासनगर  : राज्य शासनाच्या ताब्यात असलेले चार भूखंड नुकतेच उल्हासनगर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत. अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधीपक्ष या भूखंडांचा सौदा करून ते विकसित करण्यासाठी बिल्डरांच्या घशात घालत असल्याच्या आरोपांच्या घोषणा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांच्या दालनासमोर करताना ठिय्या आंदोलन केले.

बाळासाहेब ठाकरे (जुने व्हिटीसी ग्राऊंड) क्रीडासंकुल, बोटक्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट व आयडीआय कंपनीचा भूखंड हे उल्हासनगरात आहेत. त्यावर पालिकेने बांधकाम केलेले असले तरी हे भूखंड राज्यशासनाच्या ताब्यात असल्याने व त्यांची सनद पालिकेकडे नसल्याने त्यावर मोठया प्रमाणात विकासाचे काम करण्यास अडचण येत होती.

आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, ओमी कलानी,  नगरसेवक राजेश वधारिया यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे गांभीर्याने पाठपुरावा केला . राजेश नार्वेकर यांच्या आदेशान्वये  गिरासे यांनी या चारही भूखंडांना सनद जारी करून त्यांचा ताबा उल्हासनगर पालिकेला दिला आहे.

आता हे चार भूखंड बिल्डरांना  बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यास देण्याचा  ठराव महासभेत मांडण्यात आलेला आहे.

हे भूखंड बिल्डर-भूमाफिया यांच्या स्वाधीन करणे म्हणजे सौदा असून ते त्यांच्या घशात घालण्याचा डाव आखला गेला आहे,  असा उघड आरोप मनसेचे सचिन कदम, प्रदिप गोडसे, संजय घुगे, बंडू देशमुख, मनोज शेलार, मैनुद्दीन शेख, सचिन बेंडके, मुकेश सेतपलानी, शैलेश पांडव आदींनी करून आयुक्त अच्युत हांगे यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करताना ठिय्या आंदोलन केले.

याबाबत महापौर पंचम कलानी,आयुक्त अच्युत हांगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,उशिरा पर्यंत सुरू असलेल्या महासभेत ते असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT