Jitendra Awhad Felicitation at the Hands of Sharad Pawar and Sanjay Raut
Jitendra Awhad Felicitation at the Hands of Sharad Pawar and Sanjay Raut 
ठाणे

जितेंद्र आव्हाडांना साथ दिली तर ते महाराष्ट्राचा चेहरा बदलतील : शरद पवार

सरकारनामा ब्युरो

ठाणे : लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, अशी मला खात्री आहे, असंही ते म्हणाले. 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ''जिथं कर्तुत्व असतं, त्या कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नाची सोडवणूक करणारं नेतृत्व उभं राहू शकतं. जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं आहे. मागील अनेक वर्षे ठाण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल त्याचा आव्हाड यांनी नेहमीच पुरस्कार केला. यातून स्वतःचं एक स्थानही त्यांनी प्रस्थापित केलं.''

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वतःचं कर्तुत्व असलेले लोक मंत्री झाले. ठाणेकरांना असे दोन मंत्री मिळाले. त्या दोघांच्या कामातून महाराष्ट्र बदलेल असंही पवारांनी नमूद केलं.
 
शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं यावेळी  कौतुक केलं. ते म्हणाले, ''एक लोकप्रतिनिधी जागृक असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकतं हे तुम्ही कळवा-मुंब्रामध्ये जाऊन पाहा, असं आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा. मी तुम्हाला खात्री देतो की हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या जीवनातही बदल करण्यातही यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे.''

यशवंतराव चव्हाण यांनी मला भाषण झाल्यावर बोलावून घेतलं आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठं केलं, असं सांगत शरद पवार यांनी आपली एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, ''यशवंतराव चव्हाण यांनी मला एका ठिकाणी भाषण करताना ऐकलं. भाषणानंतर त्यांनी मला बोलावून घेत माहिती घेतली. तेव्हापासून मी मोठा होत गेलो. बाळासाहेब ठाकरे यांनीही मला साथ दिली,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT