Eknath Shinde-uddhav thackeray
Eknath Shinde-uddhav thackeray Sarkarnama
ठाणे

फोटोसाठी लोकांच्या जवळ जावं लागतं, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणेश मंडाळाना भेटी हा चर्चेचा विषय आहे. शिंदे यांनी आज गणेश विसर्जनाच्या दिवशी वरळीच्या पोलीस वसाहतीतील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव मंडळ यांच्या मंडपाच्या पूजेला उपस्थिती लावली. यानंतर प्रसार माध्यमकर्मींशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी उठवलेल्या प्रश्नांवर प्रत्युत्तर दिले. 'फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं. लोक मला आपुलकीनं बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री हे फोटोसेशन करण्यात आणि गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त आहेत. प्रशासकीय कामे ठप्प पडले आहेत, अशी टीका विरोधकांकडून शिंदे सरकारवर केली जात आहे. या विरोधकांच्या टिकेवर शिंदे यांना विचारले असता, त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, "मी गणेश मंडळांना भेटी देत आहे आणि राज्यभर फिरत आहे. यामुळेच आज इतर लोकही फिरत आहेत. माझ्यामुळे त्यांना पुण्य लाभत असेल तर ते त्यांनी घ्यावं. आपुलकीनं माणसं बोलवत असतात, त्यांना नकार देता येत नाही. नागरिकांना मी त्यांच्यातलाच एक माणूस वाटतो. म्हणूनच ते माझ्याजवळ येऊन फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करत असतात. त्यांच्या कार्यक्रमांना बोलवत असतात. लोकांमध्ये मिसळणारा मी माणूस आहे. त्यामुळे गणेश मंडळांना भेटी दिल्या. आता इतरही लोक फिरू लागलेत. गणेश मंडळांना भेटी देत असलो तरी राज्याच्या कारभार देखील उत्तम सुरू आहे. कालच मंत्रालयात मी बैठकाही घेतल्या", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याची टिका त्यांनी केली होती. सुळे यांच्या टिकेलाही शिंदे यांनी उत्तर दिले, "आधी सरकार कुणाचं होतं आणि कोण चालवत होतं, हेही आपल्याला माहित आहे. नियंत्रण सुटल्यामुळे आता आमच्यावर टीका केली जात आहे. आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे. यापुढे होणारे सगळे उत्सव हे निर्बंधमुक्त असतील", असे शिंदे म्हणाले.

"मुंबई असो, पुणे असो सगळ्या ठिकाणी जोरदार उत्साह आहे. पाऊस असतानाही लोकांचा उत्साह दिसत आहे. पुण्यात नागरिकांचं स्वागत स्वीकारण्यासाठी मी लोकांमध्ये गेलो तर फोटो काढण्यासाठी गेले अशी टीका झाली. पण फोटो काढण्यासाठीपण लोकं जवळ यायला लागतात ना", अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT