Bala Nandgaonkar 
ठाणे

Raju Patil: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना मनसे युती! राजू पाटलांवर कारवाईची चर्चा; बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

Raju Patil: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपनं मिळून निवडणूक लढवली पण आता शिवेसना आणि मनसे युती होऊन तिथं शिवसेनेचा महापौर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Amit Ujagare

Raju Patil : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला आहे. एकतर मनसेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीत असून त्यांनी नाशिक, मुंबई महापालिका युतीमध्ये लढल्या आहेत. त्यामुळं कल्याण-डोंबिवलीतील या युतीवरुन उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. या युतीसाठी मनसे नेते राजू पाटील यांनी पुढाकार घेतल्यानं ते सध्या टार्गेटवर आले आहेत. पण यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार का? असे सवालही सोशल मीडियातून आणि विविध माध्यमातून विचारले जात आहेत. यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नांदगावकर म्हणाले, "तिथली स्थानिक परिस्थिती मला माहिती नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर युत्या आघाड्या होत असतात. त्याच पद्धतीनं स्थानिक स्तरावर आमचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी काहीतरी अॅडजस्टमेंट केली असावी. पण याबाबत आणखी माहिती आम्हाला मिळालेली नाही. कोणतीही गोष्ट आपण नकारात्मक दृष्टीकोनातून पाहता कामा नये, काही गोष्टी सकारात्मक दृष्टीनं पाहून पुढे काय करता येईल याकडं लक्ष द्यायला हवं. मुंबईच्या जनेतेचे आभार मानतो की, त्यांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेलं नाही. भविष्यात काहीही होऊ शकतं, कोण कोणाची मदत घेईन सांगू शकत नाही. त्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले की देवाच्या मनात असेल तर काहीही घडू शकतं. पण लोकांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावले गेले."

जेव्हा वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हा त्यांनी शतप्रतिशतचा नारा दिला होता. त्यामुळं प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, पण शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं काही बिनसलं असू शकतं. त्यामुळं शिंदेंनी आपली एकहाती सत्ता असावी म्हणून स्थानिक पातळीवर निर्णय घेतला असेल. काही गोष्टी पडद्याच्या पाठीमागे सुरु असतात. त्या त्यावेळी बोलायच्या नसतात, पण घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा होत असते. राजू पाटलांनी घेतलल्या निर्णयाची मला माहिती घ्यावी लागेल. मला वाटतं की, काहीवेळेला तडजोडी या अशाच कराव्या लागतात. पक्षानं यावर काय निर्णय घ्यायचा यावर पक्ष प्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असंही नांदगावर यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात सगळीकडं फोडाफोडीचं राजकारण सुरु झालेलं आहे. भाजप काँग्रेसमुक्त भारत करणार होते पण आता काँग्रेससहित सर्वयुक्त भाजप झालेली आहे. त्यांचे आतले लोक कंटाळले असतील की आमच्यासोबत हे काय घडलेलं आहे. त्यामुळं काय नक्की घडेल यावर जरतरवर कसं भाष्य करायचं, काहीही घडू शकतं. पण शिवसेनेसोबत आमची युती पक्की आहे पक्कीच राहणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकारणात नवीन नाहीत. राजकारणात काहीही होऊ शकतं कोणी कोणाचा शत्रू नसतो.

बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष असलं आणि आमचा महापौर व्हावा असं आम्हाला वाटत असलं तरी आमच्याकडं मुंबईत पूर्ण बहुमत नाही. पण मग बहुमत आणण्यासाठी ते वरच्या स्तरावर काहीही करु शकतात, वाटलं तर भाजपही करु शकतात. भाजप ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आशीर्वादानं वाढली आहे त्यामुळं आपण सकारात्मकच विचार करायला हवा. जाणारे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळं आता आमचे सहा नगरसेवक हे आमच्यासोबतच राहतील अशी मला खात्री आहे, असंही यावेळी बाळा नांदगावर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT