Circle Officer Kidnapped by Sand Mafia in Nagar
Circle Officer Kidnapped by Sand Mafia in Nagar 
अधिकारी

जामखेडमध्ये वाळुचोरांचा प्रताप : मंडलाधिकाऱ्यांचेच केले अपहरण

सरकारनामा ब्युरो

जामखेड : पकडलेला वाळूचा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात नेत असताना वाळूचोरांनी ट्रकसह मंडलाधिकाऱ्याचेच अपहरण केले. पोलिसांनी त्यांची सुटका गेली. मात्र, नंतर मंडलाधिकारी व तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

महसूल विभागाने कारवाईसाठी वापरलेल्या खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा निषेध म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून 'काम बंद' आंदोलन केले. मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील किसन आजबे, (रा. जमदारवाडी) व पोपट दिलीप हळनावर (रा. जांबवाडी रोड) आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Circle Officer Kidnapped by Sand Mafia in Jamkhed)

तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडलाधिकारी गव्हाणे, तलाठी सुखदेव कारंडे, शिवाजी हजारे यांचे पथक जामखेड-अरणगाव रस्त्यावर मध्यरात्री गस्त घालत होते. या वेळी अरणगाव ते खडकत रोडवर वाळू वाहणारा ट्रक (एमएच 16 सीसी 5769) जामखेडकडे येत होता. पथकाने ट्रक अडवून ताब्यात घेतला. आरोपी सुनील आजबेसह ट्रक तहसील कार्यालयात आणत असताना ट्रकमालक पोपट दिलीप हळनावर याने जीपमधून (एमएच 16 बीएच 8251) येऊन ट्रक अडविली. नंतर मालक व चालकाने ट्रक तहसील कार्यालयाकडे न नेता त्यात बसलेल्या मंडलाधिकारी गव्हाणे यांच्यासह पळवून नेला. या वेळी त्यांनी ट्रकमधील वाळूही रस्त्यातच टाकून दिली. हा ट्रक गव्हाणे यांना घेऊन आष्टी (जि. बीड)च्या हद्दीत नेला.

तहसीलदार नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना माहिती दिली. जामखेड पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून आष्टी हद्दीत ट्रक पकडला व गव्हाणे यांची सुटका केली आणि ट्रक पहाटे पोलिस ठाण्यात आणला.  पोलिसांनी ट्रकचालक पोपट हळनावर यास ताब्यात घेतले आहे. अन्य तीन आरोपी पळून गेले. दरम्यान, या कारवाईत अधिकाऱ्यांनी वापरलेल्या तलाठी शिवाजी हजारे यांच्या मोटारीच्या काचा आरोपींनी फोडल्या.(Jamkhed Sand Mafia News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT