Manjusha-Mutha
Manjusha-Mutha 
अधिकारी

उपायुक्त मंजूषा मुथा यांच्या बदलीचे आदेश महिनाभर कोणी दडवले  ? 

माधव इतबारे

औरंगाबाद :   महापालिकेच्या उपायुक्त मंजूषा मुथा यांची गेल्या महिन्यात नांदेड येथे उपजिल्हाधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे; मात्र बदलीचे आदेश महिनाभरानंतर समोर आले होते.


 महिनाभरापूर्वी बदली झालेली असताना श्रीमती मुथा यांना कार्यमुक्त का करण्यात आले नाही? अशी विचारणा महापौरांनी आस्थापना विभागाकडे केली होती. त्यावर महापालिकेला यासंदर्भात कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याचा खुलासा आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी गुरुवारी (ता.26) केला.


शासनाने महापालिका उपायुक्तपदावर प्रतिनियुक्तीने दीड वर्षापूर्वी मंजूषा मुथा यांची बदली केली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुथा यांच्याकडे अनेक महत्त्वाचे विभाग दिले. महापालिकेतील नोकरभरती, कर्मचारी भरतीचा आकृतिबंध यासह अनेक कामे त्यांनी मार्गी लावली; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्या बदलीच्या प्रयत्नात होत्या. 


त्यांच्या बदलीचे आदेश आठ नोव्हेंबरला निघाले; पण ही माहिती समोर आलीच नाही. दरम्यानच्या काळात डॉ. निपुण विनायक सुटीवर गेले. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार आला. त्यानंतर शासनाने आस्तिककुमार पांडेय यांची महापालिका आयुक्त म्हणून बदली केली; परंतु या तीनही जणांनी मुथा यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. 


त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आस्थापना विभागाकडून अहवाल मागितला होता. यासंदर्भात महापौरांनी सांगितले, की आस्थापना अधिकारी श्री. दराडे यांनी मुथा यांच्या बदलीसंदर्भात अधिकृत पत्र अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आयुक्त सुटीवरून परत आल्यानंतर आपण त्यांच्याकडे विचारणा करणार आहोत.

श्रीमती मुथा यांच्या बदलीची दोन महिन्यांपासून महापालिकेत चर्चा आहे. यापूर्वी त्यांची बदली मुंबईला झाल्याचे आदेश निघाले होते; मात्र ते रद्द करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांची नांदेडला बदली झाली. हे आदेशदेखील महिनाभर दाबून ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT