over one thousand booked for violation of curfew
over one thousand booked for violation of curfew 
अधिकारी

नाशिकमध्ये हजार जणांवर संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे

सरकारनामा ब्युरो

नाशिक : पोलिस, शासकीय यंत्रणांचे अहोरात्र परिश्रम यातून नाशिक 'कोरोना'च्या संसर्ग आणि वक्रदृष्टीपासून अलिप्त राहिले. ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सजग आहे. त्यासाठी संचारबंदीचे काटोकोर पालन करण्यासाठी पोलिसांनी 'बॅरिकेडींग' कडक केले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, विनाकारण शहरात वावर वा दुकाने सुरु ठेवणाऱ्या ९५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच एक हजार २८७ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अफवा पसरविणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यात गेल्या २३ मार्चपासून संचारबंदी-जमावबंदीचे आदेश लागू आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता, नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश आहेत. जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठीच घराबाहेर पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. तरीही, अनेक अतीउत्साही नागरिक हे विनाकारण घराबाहेर पडून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत आहेत. 

'मॉर्निंग-इव्हनिंग वॉक'च्या नावाखाली बेजबाबदारपणे शहरात वावरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी १९ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान अशा ९५० जणांविरोधात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सोशल मीडियावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून अफवा पसरवल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून घरातच बसण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

आतापर्यंत कोरोनाग्रस्त देशातून नाशिकला  जिल्ह्यात ८२० नागरिक आलेले आहेत. यातील ४३३ जणांचे १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. तसेच शनिवारी ३८७ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन १७ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४० जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे प्रलंबीत आहेत. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील ११, मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील ६ आणि नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २३ जण दाखल आहेत. आजपर्यंत १९४ संशयितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले होते. त्यातील १५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एक पॉझीटिव्ह आला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर अद्यापपर्यंत 'कोरोना' संसर्गाच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT