Pritam Munde Appreciates Bharat Andhale Speech
Pritam Munde Appreciates Bharat Andhale Speech 
अधिकारी

..जेव्हा भरत आंधळेंच्या भाषणाला खासदार प्रीतम मुंडे उभे राहून टाळ्या वाजवतात

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : "फक्त समाजाची गर्दी झाली की यायचे, भाषण ठोकायचे असे मी करीत नाही. मदतीसाठी सदैव तयार असतो. काम केले नाही तर तुमच्या वेबसाईटवर बिनधास्त माझे नाव टाकून यांनी भाषण केले मात्र मदतीला आले नाही असे लिहून टाका,'' असे जोरदार भाषण पुण्याचे प्राप्तीकर खात्याचे सहाय्यक आयुक्त भरत आंधळे यांनी केले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांना खिळवून ठेवले. भाषण संपल्यावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केल्याने तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात वंजारी समाजातील व्यावसायिक व्यक्‍तींनी एकत्र स्थापन केलेल्या असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स (एओडब्ल्यूपी) संस्थेच्या प्रारंभप्रसंगी श्री. आंधळे बोलत होते. ते म्हणाले, ''मी नेहेमीच समाजाच्या कामासाठी पुढाकार घेतो. अन्य समाज काहीही नसतांना येतात, यशस्वी होतात. आपण मात्र सर्व अनुकुलता असतांना पुन्हा गावाकडे जातो. व्यवसाय करायचा तर बॅलन्सशीटची काळजी घ्या. अॅसेट असतील तसे हाताशी भरपुर खेळते भांडवल ठेवा. म्हणजे व्यवसाय यशस्वी होतो.''

ते पुढे म्हणाले, ''आपल्या समाजाकडे खुप गुणवत्ता आहे. चिकाटी आहे. एकदा भिडलो तर मुंगळ्यांसारखे यशस्वी होईपर्यंत मान तुटली तरी रांग सोडत नाही. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परिक्षेत यशस्वी होत नाही. चौथ्या, पाचव्या प्रयत्नांत का होईना यशस्वी होतोच. त्यामुळे समाजाच्या कामाला मी सदैव तयार आहे. माझ्या संपर्काचा नंबर कुठेही उपलब्ध आहे. केंव्हाही संपर्क करा.'' त्यांच्या या जोरदार भाषणाने सगळेच प्रभावीत झाले. प्रमुख पाहुण्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे तर उभे राहून टाळ्या वाजवत राहिल्या.

यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अध्यक्षस्थानी होते. पुण्यातील 'एमआयटी'चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, सामाजिक कल्याण आयुक्‍त प्रवीण दराडे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्‍त अण्णासाहेब मिसाळ, सनदी अधिकारी विवेकानंद जाधवर, निवृत्ती आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अरविंद आव्हाड, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, सुहास कांदे, अजय बोडके, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, माजी आमदार बाळासाहेब सानप, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय घुगे, उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT