अकोला

धान्याच्या काळ्याबाजारप्रकरणी कॉंग्रेस नगरसेवकाला अटक व सुटका

सरकारनामा ब्युरो

बुलडाणा : गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरु असून पोलिस कारवाई झाल्यानंतरही हा प्रकार थांबत नसल्यामुळे प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मेहकर ते चिखली दरम्यान लव्हाळा फाट्यानजीक गुरुवारी (ता. 14) सार्वजनिक वितरण प्रणालीचा 19 टन 490 किलो गहू तसेच दोन वाहनासह 25 लाख 61 हजार 820 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर वैजंने यांनी कारवाई करत चिखली येथील कॉंग्रेस नगरसेवक अब्दुल रफिक कुरेशी यांच्यासह इतर सहा आरोपींना गुरुवारी (ता.28) अटक करत न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याची होणारा काळाबाजार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंत्रणा सतर्क केली होती. अवैधरीत्या साठा करुन ठेवलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील गहू काळ्या बाजारात विक्रीकरिता जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. साखरखेर्डा येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लव्हाळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मेहकर येथील तहसीलदार संतोष काकडे यांच्या पथकाने नाकाबंदी करत सापळा रचून काळ्या बाजारात जाणाऱ्या 19 टन 490 किलो गहू व वाहने जप्त केले होते. 

याप्रकरणी सुरवातीलाचा पोलिसांनी ट्रकमधील सार्वजनिक वितरण प्रणालीचा (राशन) 19 टन 490 किलो गहू (अंदाजे किंमत तीन लाखे 50 हजार 820 रुपये), ट्रक (एमएच 37 जे 4663, किंमत अंदाजे 14 लाख) एक स्विप्ट डिझायर (एमएच 28 एएन 2117, किंमत अंदाजे 8 लाख रुपये व तीन मोबाईल किंमत अंदाजे 11 हजार रुपये असा एकूण 25 लाख 61 हजार 820 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात करत मो.फारुख मो.ईब्राहिम (30,रा.मंगळवाडी वेस, वाशिम), वाजीद मिर्झा युसूफ मिर्झा (30, रा.गड्डीपुरा, वाशिम), अल्ताफ अजीज कच्छी (32, रा.गोरक्षणवाडी, चिखली) व लक्ष्मण उर्फ सखाराम कुडके (54, रा.संभाजीनगर,चिखली) यांना ताब्यात घेण्यात आले होते. 

याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वैजंने यांनी चौकशी केली असता अटक करण्यात आलेले आरोपी इतर व्यक्तिचे नाव सांगत नसल्याने त्यांनी सर्वांचे कॉल डिटेल मागितले. यामध्ये चिखलीतील नगरसेवक अब्दुल रशीद कुरेशी, वाशिम येथून सय्यद मन्नान यांचा समावेश असल्याचे आढळल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान, चौकशीसाठी त्यांना मेहकर पोलिसांनी न्यायालयात हजर करत तीन दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत जामीन मंजूर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT