अकोला

मराठा आंदोलनातील डॉ. अभय पाटील काँग्रेसमध्ये

काँग्रेसकडून ठोस आश्वासन मिळाल्यानेच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी व अन्य वरिष्ठांशी चर्चा झाली असून त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी होकार दिल्यानंतरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.- डॉ. अभय पाटील

संदीप भारंबे

अकोला : मराठा आंदोलनातील प्रमुख नाव असलेले डॉ. अभय पाटील यांनी आज (ता. ७) काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या अनपेक्षित काँग्रेस प्रवेशाने अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज अकोल्यात होती. यावेळी स्वराजभवन येथे झालेल्या प्रमुख कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. अभय पाटील यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असून आगामी निवडणुकीत त्यांना संधी दिली जाणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजते. 

गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत डॉ. अभय पाटलांची चर्चा झाली होती. त्यानंतर वेळोवेळीही चर्चा झाली. चर्चेच्या या फेऱ्यांमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने राजकीय स्थिती बदलणार होती. परिणामी डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसची वाट निवडल्याचे समजते.

डॉ. अभय पाटील हे अकोल्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे वडिल डॉ. के. एस. पाटील हे सुद्धा अस्थिरोग तज्ज्ञ होते. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम आहे. मराठा क्रांती मोर्चांनी सर्व महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच्या काळात अकोल्यातील मोर्चाचे आयोजन व नियोजनात डॉ. अभय पाटील हे आघाडीवर होते. 

मराठा आंदोलनातील राज्यभरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला समन्वय होता. मुक मोर्चा व त्यानंतरच्या मराठा आंदोलनात त्यांचा वाटा मोठा होता. सामाजिक उपक्रमांची जोड देत त्यांनी जिल्हाभरात वेगळे नेटवर्क तयार केले आहे. 

मराठा विरुद्ध मराठा
डॉ. अभय पाटील हे काँग्रेसकडून अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रे हे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल व भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड्. प्रकाश आंबेडकर हे निवडणूक रिंगणात होते. मात्र, डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT