अकोला

बुलडाणा बाजार समितीत शिवसेनेला स्वपक्षीयांकडूनच ‘जोर का झटका’

सरकारनामा ब्युरो

अकोला : मागील काही महिन्यांपासुन आर्थिक गैरव्यवहार व अनियमित कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने आणखी एका चर्चेला उधाण आले आहे. उपसभापदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन संचालकांनी स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधातच मतदान करून सेनेलाच 'जोर का झटका' दिल्याने ते दोन बंडखोर संचालक कोण? अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकून 18 संचालक असून यामध्ये शिवसेनेचे 8 संचालक आहेत. तर उर्वरीत दहा संचालकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचा समावेश आहे. बाजार समितीच्या सभापती म्हणून शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची निवड झाली होती. तर उपसभापती म्हणून काँग्रेसचे गौतम बेगानी यांची रितसर निवड झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकीय करारानुसार गौतम बेगानी यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यावर या पदासाठी 23 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पाडली. 

या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रभाकर काळवाघे व राष्ट्रवादीकडून पंजाबराव पाटिल यांचा नामनिर्देशन अर्ज भरण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे पंजाबराव पाटिल यांचा विजय होऊन त्यांना 12 मते मिळाली. तर शिवसेनेचे प्रभाकर काळवाघे यांचा पराभव होऊन त्यांना सहा मते मिळाली. वास्तविक पाहता शिवसेनेकडे 8 सदस्य संख्या असताना व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे स्वतः सभापती असताना अशावेळी शिवसेना उमेदवाराला 8 पैकी 6 मते मिळतात ही शिवसेनेसाठी लाजीरवाणी व चिंताजनक बाब असुन शिवसेनेसाठी हा 'जोर का झटका' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिवसेनेच्या 'त्या' दोन फुटीर सदस्यांनी स्वपक्षाच्या विरोधात मतदान केल्याचे उघड होत आहे. स्थानिक शिवसेनेत दोन बंडखोरांविषयी असंतोषाची भावना व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचेच वर्चस्व व जिल्हाप्रमुख खुद सभापती असताना शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मतदान केले जाते ही बाब चिंताजनक आहे. यामध्ये इतर पक्षांशी 'सेटलमेंट' होऊन स्वतःच्या स्वार्थासाठी या निवडणुकीत विरोधी पक्षासोबत संगनमत झाल्याने यासंदर्भात पक्षश्रेष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे. 

या निवडणुकीच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेत सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पक्षातंर्गत सुरू असलेल्या कुरघोडीचे राजकारण असेच सुरू राहिल्यास आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT