Yavatmal Water Supply Funds Lapsed
Yavatmal Water Supply Funds Lapsed 
अकोला

आली दमडीही नाही, जवळचे गेले चार कोटी; पाणीपुरवठा विभागाला दिरगांई भोवली

चेतन देशमुख

यवतमाळ  : टंचाईच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी अद्याप मिळाला नसल्याने पाणीपुरवठा विभागावर टंचाई आली आहे. तर दुसरीकडे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षांतील तब्बल तीन कोटी ८२ लाख रुपये अखर्चिक असल्याने हा निधी शासन जमा करण्यात आला आहे. त्यामुळे निधीची ओरड करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाला यंदा दमडीही मिळाली नसली, तरी हातात असलेला निधी परत जाण्याची वेळ आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजनांना कात्री लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निधीअभावी आता कामांना 'ब्रेक' लागलेले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केवळ आरोग्याशी संबंधित कामे व बाबींना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवळ अत्यावश्‍यक कामेवगळता सर्व कामे थांबविण्यात आलेली आहेत. निधीअभावी अनेक कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यात टंचाईच्या काळात टंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी मिळाला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. 

असे तसले तरी पाणीपुरवठा विभागाकडे अखर्चिक असलेले तीन कोटी ८२ लाख रुपये विभागाच्या दिरगांईमुळे परत गेल्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. परत गेलेल्या निधीतून जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठ्याची कामे झाली असती. मात्र, कामे न होताच निधी परत गेल्याने आता पाणीपुरवठा विभागावर नामुष्की ओढविली आहे. टंचाईच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या निधीतून कामे झाली असती. परंतु, काहीच्या दुर्लक्षितपणापमुळे मोठा निधी परत गेला आहे. 

यंदा टंचाईच्या काळात केलेल्या उपाययोजनांची सात कोटी ८८ लाख रुपयांची मागणी पाणीपुरवठा विभागाने शासनाला केली आहे. हा निधी अद्याप आलेला नाही. दुसरीकडे हातात असलेला निधी परत गेल्याने आता पाणीपुरवठा विभागाला अखर्चिक निधीचे उत्तर देण्याची वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात उन्हाळ्यात सव्वातीनशे गावांमधील जवळपास चार लाख नागरिकांना टॅंकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला. कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजना स्थगित करण्यात आलेल्या आहेत. त्यातच आता अनेक विभागांनी केलेल्या कामांचईा निधीदेखील अडकण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. अशातच जवळ असलेला निधी परत गेल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नियोजनाचा अभाव

पाणीपुरवठा विभागाने शिल्लक असलेल्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करून खर्च केले असते तर जिल्ह्यात आणखी कामांची भर पडली असती. मात्र, आवश्‍यक त्या प्रमाणात संबंधित विभागाकडून नियोजन केले गेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता मोठी रक्कम पाणीपुरवठा विभागाच्या हातून गेल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT