अकोला

गटबाजीवर पडदा : शिवसेनेचे  यवतमाळमध्ये  नांदेकर, गायकवाड व पिंगळे हे  तीन  जिल्हाप्रमुख

राजकुमार भितकर :सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेला शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा तिढा अखेर सुटला. जिल्ह्याच्या पक्षसंघटनेची धुरा आता विश्‍वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड व पराग पिंगळे या तिघांवर सोपविण्यात आली आहे. तर, यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून संतोष ढवळे यांची निवड झाली आहे.

मुंबईत शनिवारी (ता. 17) शिवसेना भवनात विदर्भातील पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार व सचिव विनायक राऊत यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तीन जिल्हाप्रमुखांची घोषणा केली. विश्‍वास नांदेकर यांच्याकडे वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. राजेंद्र गायकवाड यांच्यावर राळेगाव, पुसद व यवतमाळ विधानसभा मतदासंघाची धुरा सोपविण्यात आली.

 तर, पराग पिंगळे यांच्यावर उमरखेड व दिग्रस या विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे. या आदेशापूर्वी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. काही वेळातच शिवसेना भवनातून हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विषयावर पडदा पडला.

जिल्ह्यात खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात दोन गट पडल्याचे सर्वश्रुत आहे. अशा वातावरणात या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना कार्य करायचे आहे. निवडणुकांचा विचार करता पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुखपदाच्या वादाचे गेल्या अनेक महिन्यांपासून भिजत घोंगडे होते. त्याचा परिणाम पक्षसंघटनेवर होत होता. त्यामुळे हा तिढा लवकर सोडवून दोन्ही गटांत समन्वय निर्माण व्हावा, असा सामाईक आदेश देण्याची गळ जिल्ह्यातील शिवसेनेच्या सुमारे 70 पदाधिकार्‍यांनी शनिवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना घातली.

 

यातून शिवसैनिकांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या बाजुने जिल्ह्यातील शिवसैनिक असल्याचे शक्तिप्रदर्शन करायचे होते. तर, खासदार भावना गवळी यांच्या बाजुचेही काही पदाधिकारी व कार्यकर्ते कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनीही आपली बाजू मांडली. ‘शिवसेनेत गटबाजी नसते’, असे म्हटले जाते. परंतु, जिल्हा शिवसेनेत असा प्रसंग पहिल्यादांच दिसून आला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT