mp omrajenibalkar news
mp omrajenibalkar news 
छत्रपती संभाजीनगर

तामिळनाडूत ६९ टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात अन्याय का?

तानाजी जाधवर

उस्मानाबाद ः तामिळनाडू मध्ये ६९ टक्के आरक्षण दिले जाते, ते कोर्टात टिकतेही, मग महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करुन हा अन्याय दुर करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली. लोकसभेत बोलतांना त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत यावर आपले परखड मत मांडले. 

ओमराजे म्हणाले, मराठा समाज १९८९ पासून नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाची सातत्याने मागाणी करत आहे. या समाजातील असंख्य तरुण- तरुणींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढुन लोकशाही मार्गेने आंदोलन केले. लाखोंच्या संख्येने अतिशय शांततेत व संयमी मार्गाने मोर्चे काढले व यशस्वी केले. याचा परिपाक म्हणून राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले.

पण दुर्दैवाने नऊ सप्टेंबरच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे आरक्षण स्थगित करण्याचा अन्यायी निर्णय घेतला. मराठा आरक्षणास मिळालेल्या स्थगितीमुळे मराठा समाज आक्रमक झाला असुन फार मोठा असंतोष निर्माण झाला आहे. संविधानाच्या कलम १५(४) च्या तरतुदीनुसार राज्य सरकारला शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासलेल्या समाजासाठी आरक्षण देण्याचा अधिकार आहे व त्या नुसारच हे आरक्षण दिले गेले होते.

जर तामिळनाडू मध्ये ६९ टक्के आरक्षण दिले जाते, शिवाय ते कायद्याच्या चौकटीत टिकत असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण का टिकू शकत नाही असा सवालही ओमराजे यांनी केला. महाराष्ट्रातील मराठा समाजावर हा अन्याय असुन केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून मराठा समाजावरील आरक्षणा बाबतीतील अन्याय दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली. तेव्हापासून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. राज्य सरकाच्या वतीने सुप्रीम कोर्टात आरक्षणाच्या मुद्यावर सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असली तरी मराठा समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

मराठा समाजाच्या आमदार, खासदार यांच्या घरासमोर घंटानाद, मोर्च काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेत देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला जात असून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT