Abdul Sattar Resignation For Cabinet Ministry
Abdul Sattar Resignation For Cabinet Ministry 
छत्रपती संभाजीनगर

कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानेच अब्दुल सत्तारांनी उपसले राजीनामा अस्त्र?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळ विस्तारमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती, तशी इच्छा आणि दावा देखील सत्तार यांनी वारंवार केला होता. यापूर्वी 'सरकारनामा'शी बोलताना सत्तार यांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पद देण्याचा शब्द दिला होता असे सांगितले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन असलेली नाराजी हे कारण असले, तरी खरे कारण हे कॅबिनेटमंत्रीपद न मिळणे हे असावे, असे बोलले जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना बंडखोरी करायला लावून महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे .सत्तार यांनी दिलेला राजीनाम्या मागे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पद न मिळाल्याची सल हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. 

प्रत्यक्षात जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा अनपेक्षितपणे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली तर ज्या सत्तार यांना कॅबिनेटचा शब्द दिला होता त्यांची बोळवण राज्यमंत्रीपद देऊन करण्यात आली.  तेव्हापासूनच सत्तार यांच्या मनात  चलबिचल सुरु होती. 

दरम्यान राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर खातेवाटप होण्याआधीच सत्तार यांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे .सत्तार यांनी दिलेला हा राजीनामा कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठीच असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तार यांच्या दबावाला बळी पडतात का ?हे पाणी आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT