शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तर अंबादास दानवे यांनी डॉ. भागवत कराडांना पेढा भरवला नाही ना? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तर अंबादास दानवे यांनी डॉ. भागवत कराडांना पेढा भरवला नाही ना? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. 
छत्रपती संभाजीनगर

डॉ. भागवत कराडांना पेढा भरवत अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंच्या जखमेवर मीठ

सरकरनामा ब्युरो

औरंगाबादः भाजपचे राज्यसभेचे उमेदवार डॉ. भागवत कराड यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित समजली जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कराड यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. दानवे आणि कराड हे जरी वेगळ्या पक्षात असले तरी ते पक्के शेजारी आहेत, त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला सारत दानवे यांनी कराड यांचे अभिनंदन केले की शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी केलेली खेळी याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेने राज्याच्या महाविकास आघाडीत सहभागी होत सत्ता काबीज केली. तेव्हापासून राज्य तसेच स्थानिक पातळीवर देखील शिवसेना-भाजप या दोन पक्षातील नेते, पदाधिकारी दुरावले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर हा वाद अधिकच विकोपाला गेला आहे. डॉ. भागवत कराड हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि कराड यांचे निवासस्थान अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

राज्यात युतीचे सरकार असतांना शिवसेना-भाजपमध्ये अनेकदा खडके उडायचे तेव्हा स्थानिक पातळीवर देखील त्याचे पडसाद उमटायचे. डॉ. कराड यांनी देखील संधी मिळेल तेव्हा, शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. पण नुकतीच डॉ. कराड यांना भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. अनपेक्षितपणे कराड यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

राज्यातातून राज्यसभेवर पाठवायच्या सात जांगासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता पाहता कराड यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशावेळी डॉ. कराड यांचे शेजारी असलेले अंबादास दानवे तरी मागे कसे राहतील? अर्थसंकल्पीय अधिवेशनाहून शहरात परतताच आज अंबादास दानवे यांनी डॉ. कराड यांचे निवासस्थान गाठले आणि पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले. 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेकडून राज्यसभेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून नाराज असलेलेल्या खैरेंनी युवानेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. गेल्या तीन दिवसांपासून खैरे यांनी आपले मोबाईल बंद करत कुणाशीही संपर्क ठेवला नाही.

एकीकडे खैरे नाराज तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदाराकडून भाजपच्या भावी खासदाराचे तोंड गोड केले जात आहे. त्यामुळे खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तर अंबादास दानवे यांनी कराडांना पेढा भरवला नाही ना? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT