Music University will be Started in Maharashtra Say Amit Deshmukh
Music University will be Started in Maharashtra Say Amit Deshmukh 
छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ उभारणार -अमित देशमुख यांची घोषणा

सुशांत सांगवे

लातूर : महाराष्ट्रात एकही संगीत विद्यापीठ नाही. त्यामुळे संगीत, नृत्य, लोककला अशा कलांना सामावून घेणारे संगीत विद्यापीठ महाराष्ट्रात उभारले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी येथे केली. जिल्हा तिथे कला अकादमी सुरू करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने अष्टविनायक प्रतिष्ठान तर्फे आयोजित राष्ट्रीय संगीत, नृत्य स्पर्धेचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अभिनेत्री निशिगंधा वाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, महापौर विक्रांत गोजमगुंडे, बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी, उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, विविध प्रकारच्या कलांना, संस्कृतीला पाठबळ मिळावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी आमच्याकडे सूचना कराव्यात. सांस्कृतिक क्षेत्रात काय-काय करता येईल, हे सांगावे. त्यातील चांगल्या बाबींचा नक्कीच सांस्कृतिक धोरणात समावेश केला जाईल. महाराष्ट्रात कला अकादमी ही केवळ मुंबईत आहे. पण, राज्याच्या कानाकोपऱ्यात या अकादमीने पोचले पाहिजे. त्याशिवाय कलेला वाव मिळणार नाही. म्हणून आम्ही 'जिल्हा तिथे कला अकादमी' सुरू करत आहोत.

लावणी महोत्सव आता राज्यभर

सांस्कृतिक विभागाचा आढावा घेताना सरकारच्या वतीने लावणी महोत्सव केवळ पश्चिम महाराष्ट्र्र घेण्याचे धोरण असल्याचे समोर आले. लावणी ही लोककला आहे. या लोककलेचा प्रसार महाराष्ट्रात सर्वत्र व्हायला हवा. त्यामुळे आम्ही धोरणात बदल केला. लावणी या लोककलेला राज्याच्या सर्व भागांत व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. सरकारच्या वतीने नाट्य स्पर्धा घेतल्या जातात. तशा संगीत आणि नृत्याच्याही घेतल्या जाव्यात, या सूचनेचाही आम्ही नक्कीच विचार करू. सांस्कृतिक धोरणात या सूचनेचा समावेश केला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. संजय बनसोडे म्हणाले, गेली पाच वर्षे या शहराचा विकास थांबला होता. पण, आता तो थांबणार नाही. आमचे सरकार लातूरचा विकास करून दाखवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT