Amit Thackeray
Amit Thackeray Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

अमित ठाकरे म्हणतात, 'बाळासाहेब मला ब्रुस ली म्हणायचे..'

सरकारनामा ब्यूरों

औरंगाबाद : मला बाळासाहेबांचा फारसा सहवास लाभला नाही. पण, मी लहानपणी जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते मला ब्रुस ली म्हणायचे, एवढंच आठवतं. असा हळवा कोपरा उलगडताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांचा कंठ दाटून आला होता. त्याचवेळी सध्या शिवसेनेत जे सुरु आहे, त्यासाठी काहीच वाटत नाही मात्र, बाळासाहेबांसाठी नक्की वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणीसाठी जूनपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्या अंतर्गतच आठ दिवसांपुर्वी तुळजापूर येथून सुरू झालेल्या दौऱ्याचा समारोप औरंगाबादेत झाला. यावेळी पत्रकारांशी त्यांनी गुरुवारी (ता. १३) रात्री अनौपचारिक संवाद साधला.

ठाकरे म्हणाले, ‘‘मनविसेची नव्याने बांधणी करत असताना जे मनसैनिक आंदोलन करतात, त्यांना मला पहिले भेटायचे होते, त्यांना भेटलो. काही मनसैनिक चांगले आंदोलन करत होते. पण ते माझ्यापर्यंत पोचत नव्हते. या दौऱ्यानिमित्त ते साध्य झाले. स्पर्धा परीक्षा आणि रोजगार या तरुणांच्या प्रश्‍नांवरच महाराष्ट्र पेटून उठतो, हे लक्षात आले. तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी मनविसे प्रयत्न करेल. स्पर्धक म्हणून मी कुणालाच पाहत नाही, माझा पक्ष बांधणे, हाच माझा उद्देश आहे. ठिकठिकाणचे स्वागत पाहून डोळ्यात पाणी येत होते.’’

फेरीवाल्यांप्रमाणे भोंगाही निकाली निघेल :

मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न निकाली काढला. तसाच भोंगा हा विषयही हाती घेतला आहे. आमच्या आंदोलनाने मागच्या सरकारला जागे केले. ते आता सरकारने सुरु ठेवायला हवे. आमची सत्ता आली तर, भोंग्यांचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावू आणि आमची सत्ता २०२४ मध्ये नक्की येईल.’’ असा विश्‍वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र :

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे लोकांना वाटते, याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, "सगळ्या ठाकरेंनी एकत्र यावे, असे मला वाटत नाही, प्रत्येकाचे विचार, पक्ष वेगळे आहेत. तसा प्रयत्नही ठाकरे परिवारांमध्ये होत नाही. आणि कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र? असा प्रतिप्रश्‍न करत याविषयी अधिक बोलण्यास रस दाखवला नाही.

लोकांनी स्विकारले तर राजकारणात :

मी सात आठ वर्ष पक्षाचे काम पाहिले. त्यांनी आधीच सांगितले होते. मी तुला लोकांवर लादणार नाही. त्यांनी स्विकारले तर, राजकारणात ये. त्यानंतर २०१९ मध्ये राज साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. कोणी गरजेपुरता मनसेला वापरतोय असे वाटत नाही. सध्याचे राजकारण पाहता, महाराष्ट्रालाच मनसेची गरज आहे, हे स्पष्ट होत आहे.

सर्वाधिक मिस करतो किआनला :

दौऱ्यानिमित्त मी पहिल्यांदाच मुलगा किआन याच्यापासून दूर आहे. त्यामुळे त्याला सर्वाधिक मिस करतो. राज आजोबांसोबत तो शिवाजी पार्क मध्ये जाऊन बसला आहे. नुकतेच त्याच्यासोबत फेसटाईमवर बोलल्याचे सांगितले. तसेच किआनचा सध्याचा आणि स्वत:चा लहानपणीचा सारखाच दिसणारा फोटोही अमित ठाकरे यांनी दाखवला.

वेळ पडली तर उमेदवारीचे बघू :

आणखीन एक ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर वेळ पडली तर बघू असे म्हणत, हो किंवा नाही, असे उत्तर देणे अमित ठाकरे यांनी टाळले. याचवेळी शेवटी पुढचा महाराष्ट्राचा दौरा विधानसभा निहाय असेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT