Suresh Warpudkar - Mohan Phad
Suresh Warpudkar - Mohan Phad 
छत्रपती संभाजीनगर

विधानसभा २०१९ : परभणी जिल्ह्यात आजी माजी आमदार काही नवख्यांमुळे निवडणुकीत चुरस

गणेश पांडे

जिल्ह्यात परभणीसह जिंतूर, पाथरी व गंगाखेड हे चार मतदारसंघ आहेत. परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मतदारसंघात जोर मारलाय. त्यांची विकासकामे आणि मतदारांशी थेट संपर्कामुळे त्यांची बाजू भक्कम दिसते. त्यांच्या विरोधात माजी खासदार (कै.) अशोकराव देशमुख यांचे पुत्र रविराज आहेत.

माजी आमदार (कै.) कुंडलीकराव नागरे यांचे पुत्र सुरेश हेदेखील अपक्ष रिंगणात उतरलेत. नागरे कॉंग्रेसकडून इच्छुक होते. परंतु, त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. सुरेश नागरेंच्या उमेदवारीला कॉंग्रेसमधून विरोध होता. राष्ट्रवादीनेदेखील त्यांना विरोध केला होता. कदाचित, त्यामुळेच नागरेंना उमेदवारी मिळाली नसावी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेख मोहम्मद गौस यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा कॉंग्रेसच्याच मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे.

       डाॅ. राहुल पाटील

गंगाखेडमधून राष्ट्रवादीचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांना पक्षाने परत रिंगणात उरवलेय. परंतु, येथूनच संतोष मुरकुटे आणि माजी आमदार सीताराम घनदाट हेदेखील अपक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेने जिल्हाप्रमुख विशाल कदमांसारखा उमदा तरुण रिंगणात उतरवलाय. वंचित बहुजन आघाडीने करुणा कुंडगिर यांना रिंगणात उतरविले आहे. करुणा कुंडगिर ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजाचे मतदान येथे निर्णायक आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता असून, या ठिकाणचा विजय हा धक्कादायक असू शकतो.

पाथरीमधून अपक्ष आमदार मोहन फड यांना भाजपने मित्रपक्ष रिपाइंच्या तिकिटावर रिंगणात उतरवलेय. फड यांचे मतदारसंघात चांगले काम असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांना रिंगणात उतरवलेय. पूर्वीचा सिंगणापूर मतदारसंघ हा वरपुडकरांचा गड मानला जात होता. त्याच मतदारसंघातील बहुतांश गावे पाथरीत गेल्याने ती वरपुडकरांसाठी जमेची बाजू मानली जाते. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात विलास बाबर यांना उमेदवारी दिली आहे.

          विजय भांबळे

जिंतूरमधून राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने रासपच्या तिकिटावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात मेघना यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय. या मतदारसंघात जिंतूर आणि सेलूसारखे दोन मोठी शहरे येतात. आमदार विजय भांबळे यांच्या पाच वर्षांतील कामगिरीवर मतदार समाधानी आहेत. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मनोहर वाकळेंना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून सरळ दुरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

महत्त्वाचे प्रश्न
- उंजळबा औद्योगिक परिसराची निर्मिती रखडली
- जिल्ह्याला शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज
- सिंचनासाठी मुबलक पाणी आवश्‍यक
- जिल्हा रुग्णालयासह सर्व आरोग्य केंद्र असक्षम
- ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT