Devendra Phadanavis and MP Pritam Munde Addressing Press Conference
Devendra Phadanavis and MP Pritam Munde Addressing Press Conference 
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्र्यांकडून आघाडीच्या यात्रांची खिल्ली...म्हणाले 'सुरुवात मंगल कार्यालयात अन सभा छोट्या सभागृहांत

दत्ता देशमुख

बीड : ''भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला रस्त्यावर स्वागतला झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही सभा घ्याव्या लागत आहेत. तर, काँग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरुवात मंगल कार्यालयात करुन सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. तर, राष्ट्रवादीतही शिवस्वराज्य आणि संवाद अशा दोन यात्रा सुरु आहेत," अशी खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडविली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात पोचून बीड व आष्टी येथे सभा झाल्या. त्यानंतर मंगळवारी (ता. २७)फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेबाबत माहिती दिली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, सुरजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ''महाजनादेश यात्रेत आतापर्यंत १६४१ किलोमिटरच्या प्रवासात ६० मतदार संघात पोचले आहोत. शेवटपर्यंत ३२ जिल्ह्यांतील १५० मतदार संघात यात्रा पोचणार आहे. सर्वच कामे केल्याचा आमचा दावा नसून पुर्वीच्या सरकारपेक्षा उत्तम कामे केली आहेत. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या अपेक्षा समजून घेऊन कामे करणार आहोत. आम्हीच प्रश्न सोडवू शकतो हे लोकांच्या लक्षात आल्याने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. सभांव्यतिरिक्त रस्त्यांवर यात्रेच्या स्वागताला एवढी गर्दी होते आहे की तिथेही आम्हाला सभा घ्याव्या लागत आहेत.''

विरोधकांनी सुरु केलेल्या यात्रेतून त्यांचाच पर्दाफाश होत असल्याची टीका करत काँग्रेसला त्यांची यात्रा मंगल कार्यालयात सुरु करावी लागल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेनंतर आता संवाद यात्रा काढली आहे. त्यांनी सत्तेत असताना लोकांशी संवाद साधण्याऐवजी स्वत:शीच संवाद साधला नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या गुन्ह्याबाबत विचारले असता, गुन्हा दाखल झाला असून आता तपास करुन आरोपपत्र अशा सर्व बाबी नियमांनुसार होतील, असे उत्तर त्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT