minister nawab malik news aurangabad
minister nawab malik news aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

`सरकार पडणार`, हे भाकित करण्याचा भाजप नेत्यांना छंदच जडलायं..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः महाविकास आघाडीचे सरकार महिन्या दोन महिन्यात पडणार असे भाकीत करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना छंद लागला आहे. मात्र हे सरकार केवळ पाच वर्षच नव्हे तर २५ वर्षांपर्यंत टिकेल, असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. गेली बारा वर्ष जनसेवा करत पदवीधर, शिक्षक व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे  महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा विजयी करा, असे आवाहनही मलिक यांनी केले.

नवखंडा महाविद्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. मलिक म्हणाले, पदवीधर मतदान प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. यात निवडणूक आयोगाने पुरविलेल्या पेननेच पसंतीचे क्रमांक नमूद करायचे असतात. मतपत्रिका फोल्ड करताना उभी फोल्ड करावी अन्यथा तुमचे मत अवैध ठरू शकते.  महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा विजयी करायचे असल्याने आपले मत बाद होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

सरकार पडणार ही भाजप नेत्यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. हे सरकार पुढची चार वर्ष आणि त्या पुढील २५ वर्ष देखील कायम राहील. केवळ भाजपमधील नेते आणि आमदारांना रोखून ठेवण्यासाठी सरकार पडणार असे त्यांच्याकडून सांगितले जाते, असा टोला देखील नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.

चांगल्या कामाची पावती मिळेल..

यावेळी आमदार विक्रम काळे म्हणाले, पदवीधरचा उमेदवार चाणाक्ष आहे. तो पक्ष किंवा चेहरा बघून मतदान करत नाही. ८० टक्के मतदार हे उमेदवाराचे काम बघून मत देतात. गेल्या १२ वर्षात  चव्हाण यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. याची माहिती घेत मतदार त्यांना या कामाची पावती तिसऱ्यांदा संधी देत देतील, अशी खात्री मला आहे.

राजकारणाच्या बाहेर जाऊन चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी मराठवाड्यात नावाजलेली औरंगाबाद शहर उर्दू माध्यम शैक्षणिक संस्था म्हणजेच नवखंडा महाविद्यालय असल्याचे सतीश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सर्वच प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही, पण आगामी काळात पदविधरांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मला पुन्हा एकदा विधपरिषदेत मराठवाडा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन सतीश चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

युवा सेनेचा विजय संकल्प मेळावा..

युवा सेनेचे महाविद्यालय कक्ष प्रमुख ऋषीकेश जैस्वाल यांच्या संयोजनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा सेनेचा विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले, बारा वर्षात मराठवड्याचे प्रश्न आक्रमकपणे सतीश चव्हाण यांनी विधीमंडळात मांडले. याचे कौतुक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही केले आहे. सतीश चव्हाण हे यंदा हॅट्रीक साधणारच. यावेळी युवती प्रमुख डॉ. अश्विनी जैस्वाल, मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT