Bajrang Jadhav BJP Rebel Ausa Constituency Marathwada
Bajrang Jadhav BJP Rebel Ausa Constituency Marathwada 
छत्रपती संभाजीनगर

औसा मतदारसंघातील बंडखोर बजरंग जाधव यांची भाजपमधून हकालपट्टी

सरकारनामा ब्युरो

औसा : औसा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या नावाची उमेदवार म्हणून मागील दोन वर्षांपासून चर्चा होती. अभिमन्यू पवार यांनी या कालावधीत मतदारसंघाच्या विकासासाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आजवर मागास असणारा मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय. महायुतीने अपेक्षेनुसार त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. आजवर केलेली विकास कामे आणि महायुतीची वज्रमूठ पाहता पवार यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. या घडामोडीनंतर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे इतरांनाही अडचणीत आणण्याच्या हेतूने बजरंग जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे सदस्यत्व आणि पद असतानाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. हा पक्ष शिस्तीचा भंग ठरतो.

शिस्तप्रिय पक्ष असणाऱ्या भाजपाने या बाबीची गंभीर दखल घेतली. पक्षाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेकांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्याच पद्धतीने बजरंग जाधव यांना देखील भाजपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले, स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी आणि पदही दिले त्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणे जाधव यांना चांगलेच महागात पडले आहे. उमेदवारी तर नाहीच परंतु, सध्या त्यांच्याकडे असणारे पदही त्यांना सोडावे लागणार आहे. या उपरही भूलथापा आणि अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि पवार यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करावे, असे आवाहन औसा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT