Chandrakant Khire Answers Nitin Gadkary Allegations
Chandrakant Khire Answers Nitin Gadkary Allegations 
छत्रपती संभाजीनगर

नितीन गडकरींचे विधान स्वपक्षातील नेत्याला उद्देशूनच : चंद्रकांत खैरे 

सरकारनामा ब्युरो


औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारासंदर्भात केलेले विधान हे त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याला उद्देशून केल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. माझ्याकडे त्या बड्या नेत्याने राजूर संस्थानची जागा हडपल्याची निनावी तक्रार आल्याचेही त्यांनी कोणाचे नाव न घेता सांगितले.

श्री. गडकरी यांनी गेल्या रविवारी (ता. 12) येथील महाएक्‍स्पोच्या समारोपप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि रस्त्याची कामे करणारे कंत्राटदार यांच्यातील संबंध आणि त्यातून रखडलेली कामे याचा दाखला देत कठोर शब्दांत टीका केली होती. यासंदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, ते म्हणाले, ''मी गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात आहे. दोनदा आमदार आणि चारवेळा सलग खासदार म्हणून निवडून आलो; परंतु माझ्या कारकीर्दीत कधी मला असा अनुभव आला नाही. मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. कोट्यवधींचा निधी त्यावर खर्च केला; पण कधी कुण्या कंत्राटदाराला त्रास दिला नाही.''

ते पुढे म्हणाले, "केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलेले विधान किंवा त्यांना आलेला अनुभव हा चुकीचा नाही. मी खासदार असताना अनेकदा मतदारसंघातील कामासाठी माझा त्यांच्याशी संपर्क यायचा. खासगी गप्पांमध्ये त्यांनी अनेकदा मराठवाड्यातील त्यांच्याच पक्षातील एका नेत्याचे नाव घेऊन उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केलेले विधान हे त्याच नेत्याला उद्देशून होते, असे मला वाटते. औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम रखडल्याबद्दल श्री. गडकरी यांनी नाराजी बोलून दाखवली होती. या रस्त्याचे काम रखडल्याने न्यायालयातदेखील याचिका झाली होती. त्यानंतर आधीच्या कंत्राटदाराला बाजूला सारून दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात आले, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, गडकरी कुणावर नाराज आहेत!''

नाव घ्यायला हवे होते

महाएक्‍स्पो'च्या कार्यक्रमात बोलताना श्री. गडकरी यांनी त्या नेत्याचे नाव घेऊन टीका करायला हवी होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या, असेही मत व्यक्‍त करून श्री. खैरे म्हणाले, की माझ्याकडे जालना येथून निनावी तक्रार आली आहे. त्यात या बड्या नेत्याने राजूर संस्थानची जागा हडपल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT