Congress EX MLA Nitin Patil Enters BJP
Congress EX MLA Nitin Patil Enters BJP 
छत्रपती संभाजीनगर

कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील भाजपमध्ये; जिल्हा बॅंकेतील घोटाळे दबणार?

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कॉंग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन सुरेश पाटील यांनी दोन संचालक, इतर कार्यकर्त्यांसह शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांचे वडील सुरेश पाटील कॉंग्रेसचे निष्ठावंत होते. जिल्हा बॅंकेतील विविध घोटाळ्यांची शासनस्तरावर सुरू असलेली चौकशी रोखण्यासाठी नितीन पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. 

नितीन पाटील यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक जावेद शब्बीर पटेल, संचालक शांतिलाल छापरवाल, कन्नडचे खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, महेगावचे सरपंच पाडुरंग घुगे, डॉ. प्रकाश चव्हाण, भगवान काजे, साखरवेलचे सरपंच देवेन घुगे, कैलास आकोलकर, योगेश खैरनार, राहुल राठोड, प्रवीण गर्जे पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रवेश केला.

स्थापनेपासून प्रथमच बॅंकेवरील कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून संचालक मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य बॅंकेचे संचालक या नात्याने नितीन पाटील यांचाही पोलिसांनी आरोपींत समावेश केला आहे. जिल्हा बॅंकेतील पायलट ऊस विकास योजनेत साडेतीन कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विहीर तसेच विद्युत मोटार नसणाऱ्यांना उसाच्या नावाखाली कर्ज देण्यात आले होते. विक्री केलेल्या जमिनींवर काही महाभागांनी कर्जे मिळविली होती.

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, नितीन पाटील हे संशयित आरोपी आहेत. जिल्हा बॅंकेतील नोकर भरती घोटाळ्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. साडेआठ कोटी रुपयांचे सहकारी संस्थांचे कर्ज माफ केल्याच्या प्रकरणात पाटील यांच्यासह काही संचालकांवर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT