Zambad- Autade  
छत्रपती संभाजीनगर

काँग्रेसतर्फे औरंगाबादेत सुभाष झांबड  तर जालन्यात विलास औताडे 

सरकारनामा

औरंगाबाद : काँग्रेस पक्षातर्फे अखेर औरंगाबाद आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . औरंगाबाद लोकसभेसाठी  सुभाष झांबड    तर जालना लोकसभा मतदारसंघासाठी विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . 

या दोघांना चार चार टर्म सलग खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेचे  चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सामना करावयाचा आहे . 

सुभाष झांबड हे सध्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची  मुदत चालू वर्षात  ऑगस्ट महिन्यात संपते .  सुभाष झांबड  औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार  यांच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत . आणि अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांचे  अतिशय विश्वासातील अनुयायी आहेत . त्यामुळे सुभाष झांबड यांना उमेदवारीच्या शर्यतीत कल्याण काळे आणि प्रा. बनसोड यांच्यावर मात करता आली आहे . 

सुभाष झांबड  हे मूळचे वैजापूर तालुक्यातील असून औरंगाबाद शहरात त्यांचा मोठा व्यापार आणि व्यवसाय आहे . एका अर्बन बँकेचा कारभारही ते पाहतात . मात्र ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांना आता  संपर्क वाढवावा लागेल . शिवाय  वंचित आघाडीचे मोठे आव्हान  त्यांच्यासमोर राहील  . सुभाष झांबड यांनी दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणूक लढविली होती . पण त्यांना यश मिळाले नव्हते . 

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे स्थानिक प्रबळ उमेदवार नव्हता . काँग्रेस नेते  शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी नक्की काँग्रेस पक्षात येतील या समजुतीने बेसावध राहिले . अखेर दानवे आणि खोतकर जोडीने काँग्रेसला तोंडघाशी पाडले .जालना जिल्ह्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल किंवा अन्य नेते उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते .  त्यामुळे काँग्रेसला पुन्हा विलास औताडे यांच्याकडे धाव घ्यावी लागली आहे .

 विलास औताडे हे २०१४ मध्येही काँग्रेसचे जालन्याचे उमेदवार होते . पण तेंव्हा मोदी लाट होती आणि मोदींची जालन्यात मोठी सभाही झाली होती .त्यामुळे विलास औताडेंचा पराभव झाला होता .  विलास औताडे हे ज्येष्ठ नेते केशवराव औताडे यांचे चिरंजीव आहेत . केशवराव औताडे हे प्रदीर्घकाळ औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे  अध्यक्ष होते . माजी आमदार होते आणि शंकरराव चव्हाण यांचे  ते निष्ठावंत अनुयायी होते .

 महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचे अध्यक्षपद विलास औताडेंनी  भूषविलेले आहे . विलास औताडे तीन चार महिन्यापासूनच तयारीला लागलेले असून त्यांनी मतदारसंघातील अनेक मोठ्या गावांचे दौरे केलेले आहेत . जालना लोकसभा मतदार संघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे . औताडे यांचे फुलंब्री मतदारसंघात काम आहे आणि संपर्कही आहे . अब्दुल सत्तर यांच्यामुळे औताडेंना सिल्लोड मतदारसंघातही मदत होऊ शकते . 

दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेते फक्त जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर  आणि विमानतळावर दिसणार की मनापासून उमेदवारांचे काम करतात यावर बरेच काही अवलंबून आहे . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT