Dhananjay Munde Took Cognizance of Poor Child
Dhananjay Munde Took Cognizance of Poor Child 
छत्रपती संभाजीनगर

'माझे पप्पा' निबंध लिहिणाऱ्या 'त्याची' धनंजय मुंडेंनी घेतली दखल 

राजू सोनवणे

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी या छोट्याशा गावातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मंगेश वाळके या विद्यार्थ्याचा 'माझे पप्पा' हा अत्यंत भावनिक निबंध व्हायरल झाल्यानंतर आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याची दखल घेतली आहे. मंगेशच्या परिवाराला सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण निधीतून अर्थसहाय्य व इतर मदत मिळणार आहे. छोट्याशा मंगेशच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नसून आई दिव्यांग आहे. 

'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबी च्या आजाराने वारले, मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली, आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला व आईला चोरांची भीती वाटते, पप्पा मला तुमची खूप आठवण येते,' अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपल्या व्यथा शाळेतील निबंधाच्या वहीत मांडल्या होत्या.

मंगेशच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आहे त्याच्या आई शारदा वाळके ह्या दिव्यांग आहेत. परिवारात कोणीही कमावते नसल्याने माय-लेकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मंगेशच्या दाटलेल्या भावना पाहून त्याच्या शिक्षिकेने तो निबंध इतराना पाठवून मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गेल्या दोन दिवसात विविध माध्यमात याची जोरदार चर्चा सुरू होती.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ समाज कल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजने' अंतर्गत 1.5 लक्ष रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५%, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसेच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसहाय्य आदि योजना लागू करून वाळके परिवारास भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेश व त्याच्या परिवाराला सहाय्य मिळेल हे आता निश्चित झाले असून मुंडे यांची सामाजिक संवेदनशीलता या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT