Mla Dhus and his son news beed
Mla Dhus and his son news beed 
छत्रपती संभाजीनगर

कुस्तीच्या मैदानात दोन हात करणारे धस पिता-पुत्र राजकारणात कुणाला चीतपट करणार..

दत्ता देशमुख

बीड : राजकीय आखाड्यात आणि कुस्तीच्या मैदानात रंगणाऱ्या कुस्त्यांत पिता - पुत्रांचा सामना पाहण्याचा योग तसा कमीच. मात्र, भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचे पुत्र, राजकीय वारसदार जयदत्त धस यांच्यात कुस्तीच्या फडात रंगीत तालिम चांगलीच रंगली. आदल्या दिवशी कुस्तीचा सराव करणारे पिता पुत्र दुसऱ्या दिवशी दुचाकीवरुन देखील एकत्र फिरले हे विशेष.

सुरेश धस हे राजकारणातील अवलिया व्यक्तीमत्व. बोलण्यात ग्रामीण ढंग आणि विनोदी असणारे धस तेवढेच अभ्यासू आणि आक्रमकही आहेत. केवळ भाषणातच नाही तर त्यांच्या राजकीय डावपेचांनी अनेकदा राजकीय गणिते बदलल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. पहिल्याच डावात आपल्या राजकीय गुरु असलेल्या साहेबराव दरेकरांना गारद करणाऱ्या सुरेशरावांनी सलग तीन वेळा विधानसभा जिंकण्याचीही किमया केली.

विशेष म्हणजे त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत जाताना जिल्हा परिषद निवडणुकीत पहिला डाव टाकून जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याची किमया केली. त्यानंतर ऐनवेळी अध्यक्षपदाची माळ समर्थक सय्यद अब्दुल्ला यांच्या गळ्यात पाडण्याचा डाव असेल किंवा मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीत असताना भाजपच्या ताब्यात जिल्हा परिषद देण्याची खेळी सुरेश धसांनीच खेळली.

राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या लातूर - उस्मानाबाद - बीड मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडणुक जिंकण्याचा पराक्रम देखील त्यांच्या राजकीय डावपेचांमुळेच शक्य झाला. दरम्यान, त्यांच्यातील अनेक राजकीय गुण त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी उचलले आहेत. लोकांच्या भेटी गाठी, सुख - दु:खात हजेरी आणि शासकीय कार्यालयांत पाठपुराव्याची जबाबदारी आता जयदत्त धसांच्या खांद्यावर आहे. त्यांना भविष्यात आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघात कुस्ती खेळायची असल्याने याची तयारी त्यांनी पुर्वीच केली आहे.

दरेकरांच्या घरी सोयरीक केल्याने त्यांची ताकद वाढण्यावर अगोदरच शिक्कामोर्तब झाले आहे. २०१९ ची संधी हुकली असली तरी २०२४ साठी त्यांनी सराव सुरु केलेला आहे. दरम्यान, काल सुरेश धस व त्यांचे पुत्र जयदत्त धस यांच्यात कुस्तीच्या फडात रंगीत तालिम सुरु असल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर भलतेच व्हायरल झाले. तसे दोघेही राजकीय फडातले पैलवान असताना कुस्तीच्या फडातल्या त्यांच्या रंगीत तालमिची राजकीय फडात चांगलीच चर्चा झाली.

आता सुरेशरावांनी कुस्तीच्या फडात चिरंजीवाला राजकारणातला नेमका कोणता डाव शिकवला हे त्यांनाच ठाऊक. पण, दुसऱ्याच दिवशी पुन्हा हे बापलेक एकाच दुचाकीवरुन सवारी करतानाही आष्टीकरांच्या नजरेस पडले. नव्या जमाण्यातील स्कुटी असली तरी सारथ्य सुरेश धस करत होते आणि मागे जयदत्त धस बसलेले होते. त्यांनी आष्टीतील नगरोत्थान योजनेतील कामांच्या पाहणीच्या निमित्ताने ही सवारी केली पण त्याची चर्चा सोशल मिडीयावर भलतीच झाली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT