collector tacke a charge news aurangabad
collector tacke a charge news aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

पदभार घेताच जिल्हाधिकाऱ्यांकडून निजामकालीन हर्सुल तलावाची पाहणी

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदभार स्वीकारताच आज निझामकालीन हर्सुल तलावाला भेट देऊन तेथील पाणी पातळी, तलावाला लागून असलेल्या नागरी वसाहतींना होणारा संभाव्य धोका, पाझर तलावांची माहिती घेतली. तसेच महापालिका, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राजकीय पक्षांकडून केवळ पुर्णपणे भरलेल्या हर्सुल तलावाचे जलपूजन करत राजकारण केले गेले. परंतु तलावतील वाढत्या पाणी पातळीमुळे खामनदीच्या काठावर असलेल्या वसहतींना होणारा धोका याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाती घेतल्याचे आजच्या भेटीवरून दिसते.

औरंगाबाद शहरातील हर्सुल तलाव हा निझामकालीन म्हणून ओळखला जातो. शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी जुन्या शहरातील अठरापेक्षा अधिक वार्डांना अजूनही हर्सुल तलावातूनच पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे हर्सुल तलावाचे महत्व मोठे आहे. यंदा शहर व जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षानंतर हर्सुल तलाव पुर्णपणे भरून ओव्हरफ्लो झाला आहे.

काही दिवसांपुर्वी शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांकडून हर्सुल तलावाचे जलपूजन करत कुरघोडीचे राजकारण करण्यात आले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप नाट्य देखील रंगले होते. परंतु हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे खामनदीच्या काठी वसलेल्या वसाहतींना होणारा धोका टाळण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते. केवळ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या वसाहतींना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला होता.

दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात बदली झाली आणि त्यांचा अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. आता सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारीपदी काल नियुक्ती करण्यात आली असून पदभार घेताच दुसऱ्या दिवशी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हर्सुल तलावाची पाहणी केली. हर्सुल तलाव, या तलावांवरील १९ पाझर तलावांचे महानगरपालिका, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे तपासणी करून तत्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

नागरिकांना प्रवेश बंदी

हर्सुल तलावातील पाण्याची पातळी, साठा, वितरण, तलावाकाठची गावे, नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना, करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा चव्हाण यांनी घेतला. हर्सुल तलावात येणाऱ्या पाण्याच्या १९ पाझर तलावांसह, खाम नदी काठच्या नागरिकांना आवश्यक त्यावेळी सतर्कतेचा इशारा दवंडी, एसएमएसच्या माध्यमातून तत्काळ देता येतील अशी व्यवस्था करण्याच्या सूचना देखील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिल्या. 

पावसाळ्यामध्ये हर्सुल तलावावर नागरिकांना प्रवेशबंदी करून या ठिकाणच्या सर्व फलकांवर सुस्पष्ट संदेश असावेत. चोवीस तास कर्मचारी, विजेचे खांब लावण्याच्या सूचना देतांनाच  तलावांसह खामनदीतील पाण्याची पातळी समजण्यासाठी मैलांच्या दगडांचा वापर करून पाण्याच्या पातळीची मार्किंग करावी, असेही चव्हाण यांनी संबंधितांना सांगितले.  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी  तलावावरील नागरिकांशी संवाद साधत तलावाची काळजी घेण्याचे आवाहनही केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT