Subhash-Mane
Subhash-Mane 
छत्रपती संभाजीनगर

माजी पणन संचालक सुभाष माने औरंगाबाद पुर्वमधून निवडणुक लढवणार 

हरी तुगांवकर

लातूर :  शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात नव्याने राज्याचे माजी पणन संचालक सुभाष माने यांचे नाव जोडले गेले असून औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुक लढवणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने तशी घोषणाच लातूरात करण्यात आली. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वहायला सुरूवात झाली तशी राजकीय पक्षांची लगबग देखील वाढली. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह नव्याने राजकारणात पाऊल ठेवू पाहत असलेले छोटे-मोठे पक्ष देखील शड्डू ठोकण्याच्या तयारी आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाने देखील उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील यांनी राज्यातील पहिली उमेदवारी सुभाष माने यांना जाहीर केली आहे. 

औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघातून पणन संचालक सुभाष माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  औरंगाबादमध्ये विभागीय उपनिबंधक म्हणून देखील ते अनेक वर्ष कार्यरत होते. या दरम्यान त्यांचा वाढलेला शहरातील जनसंपर्क पाहता त्यांना पुर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र विकास आघाडीने 2014 मध्ये लोकसभेच्या पाच तर विधानसभेच्या 26जागा लढवल्या होत्या. भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याला आपले प्राधान्य असणार आहे असे देखील अण्णा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुभाष माने यांना विधानसभेची उमेदवारी देत पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. माने यांची राष्ट्रीय कार्यकारणी सचिवपदी देखील आज नियुक्ती करण्यात आली. 

राज्याचे माजी पणन संचालक असलेल्या सुभाष माने यांनी जानेवारी ते डिसेंबर 2014 या वर्षभराच्या कार्यकाळात राज्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी आडत बंद करण्याचा निर्णय घेऊन वर्षाकाठी शेतकऱ्यांचे दोन हजार कोटी रुपये वाचवले. मुंबई बाजार समितीतील एफएसआयचा घोटाळा उघडकीस आणून संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची धडाकेबाज कारवाई केली होती. यात एका कॅबिनेट मंत्र्यासह दोन आमदारांचा देखील समावेश होता. 

शासनाचा पैसा घेवून कृषी प्रक्रिया उद्योग न उभारणाऱ्या संस्थावर कारवाईचा बडगा, बाजार समित्यांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स काटे बंधनकारक, शेतकऱ्यांची तोलाई बंद करण्या सारखे निर्णय घेतले होते. राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी नातलगांची नोकरी भरती रद्द करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला होता. 

subhash Mane 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT