danave_and_khotkar
danave_and_khotkar 
छत्रपती संभाजीनगर

मीच खरा पेहेलवान , मग माझे नाव निमंत्रण पत्रिकेत कसे असेल?- रावसाहेब दानवेंचा टोला 

जगदीश पानसरे

औरंगाबादः "जालन्याच्या राजकारणात मीच खरा पेहेलवान आहे, आणि जो कुस्ती लढणारा, जिंकणारा असतो त्याचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसते, तेव्हा महाराष्ट्र केसरीच्या निमंत्रण पत्रिकेत माझे नाव कसे असेल ?" असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी  अर्जुन खोतकर यांना   सरकारनामाशी बोलतांना  लगावला. 

शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी 22 व 23 डिसेंबर रोजी जालन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे आमंत्रण राज्यभरातील राजकीय नेते, मंत्री, आजी, माजी आमदार, खासदारांना देण्यात आले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिका व वृत्तपत्रांमधील जाहीरातीत देखील पन्नासहून अधिक जणांची नावे टाकण्यात आली. पण जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे व त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांना त्यातून वगळण्यात आले. 

या संदर्भात खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "कुठल्याही स्पर्धेत खेळाडूचे नांव कधी तुम्ही निमंत्रण पत्रिकेवर टाकल्याचे पाहिले आहे का? महाराष्ट्र केसरी ही पहिलवांनाची स्पर्धा आहे आणि जालना जिल्ह्यातील राजकारणातला मीच खरा आणि जिंकणारा पेहेलवान 
आहे. कदाचित म्हणूनच माझे नाव निमंत्रण पत्रिकेत संयोजकांनी टाकले नसावे. त्यामुळे मला त्याबद्दल आश्‍चर्य किंवा कसल्याही प्रकाराचा खेद वाटत नाही."

"अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटनाला या असा फोन आणि मेसेज मला केला होता. पण मी पक्षाच्या बैठका आणि इतर कामामंमध्ये व्यस्त असल्यामुळे येऊ शकणार नाही असे त्यांना कळवले होते. म्हणूनही त्यांनी निमंत्रण पत्रिकेत माझे नाव टाकले नसेल. पण शक्‍य झाल्यास कुस्ती स्पर्धेच्या समारोपाला मी नक्की जाईन ,"असेही दानवे यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT