mp imtiaz jalil reaction cbi court jadgment news
mp imtiaz jalil reaction cbi court jadgment news 
छत्रपती संभाजीनगर

पुर्वनियोजित कट नव्हता, तर मग बाबरी मशीद वाऱ्याने पडली का?

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः बाबरी मशीद प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज ज्या ३२ जणांना निर्दोष असल्याचे जाहीर केले, या निकालाचे आम्हाला आश्चर्य वाटले नाही. अशाच न्यायाची अपेक्षा आम्हाला होती. फक्त कोर्टाने आता मशीद पाडणे हा पुर्वनियोजित कट नव्हता, तर त्या दिवशी जोराचा वारा सुरू होता आणि त्यात बाबरी मशीद पडली असे जाहीर करावे, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. देशातील एक प्रमुख संस्था असलेल्या सीबीआय कोर्टाकडून अशा प्रकारचा निकाल आल्याने भविष्यात असेच घडेल आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.

६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली. या प्रकरणात भाजपसह काही हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांसह ३२ जणांवर पुर्वनियोजित कट करून ही वास्तू पाडण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा निकाल आज सीबीआय न्यायालयाने दिला. बाबरी मशीद पाडणे हा पुर्वनियोजित कट नव्हता असे स्पष्ट करत सर्व ३२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतांनाच एमआयएमने या निकालावर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना खासदार तथा महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. इम्तियाज जलील म्हणाले, निर्दोष मुक्त झाल्यानंतर सर्व ३२ आरोपींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्हाला अशाच निकालाची अपेक्षा होती, त्यामुळे आम्हीही निर्णयाचे स्वागत करतो. बाबरी मशीद पाडणे हा पुर्वनियोजित कट नव्हता तर मग ती वाऱ्याने पडली का? मग सीबीआय कोर्टाने तसे सांगून टाकावे. सगळे आरोपी निर्दोष सुटतील हे आम्हाला अपेक्षितच होते. त्यामुळे या निकालाचे आश्चर्य वाटले नाही.

सीबाआय सारखी देशातील एक प्रमुख संस्था जर अशा प्रकारचे निकाल देत असेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात देखील अशा प्रकारचे काही निकाल आले, तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. अशा निकालांवरून आता न्याय कुणाकडे मागायचा, मागितला तर तो मिळेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल असाच हा निकाल असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT