Imtiaj-Jaleel-MLA
Imtiaj-Jaleel-MLA 
छत्रपती संभाजीनगर

'एनडीटीव्ही'चा पुण्याचा रिपोर्टर ते औरंगाबादचे आमदार - इम्तियाज जलील यांचा प्रवास

जगदीश पानसरे :सरकारनामा ब्युरो

आमदार इम्तियाज जलील , एमआयएम औरंगाबाद यांची वाटचाल त्यांच्याच शब्दात 

"माणसाच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात, ठरवलं ते प्रत्यक्षात उतरेल असेही नाही, मला देखील असाच अनुभव आला. पत्रकारिता करतांना राजकारण जवळून पाहता आल, पण पुढे याच राजकारणाचा भाग होईल असे वाटले नव्हते. 

10 ऑगस्ट 1968 साली सुशिक्षित कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील सिव्हील सर्जन होते .  भाऊ जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक आहे .   होलीक्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये माझे शालेय तर   मौलाना आझाद कॉलेज आणि एसबी कॉलेज येथे  महाविद्यालयीन शिक्षण घेतले .  जेएनईसीतून एमबीए आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीजे, एमजेची पदवी असा माझा शैक्षणिक प्रवास. 

पत्रकारितेचे शिक्षण झाल्यानंतर शहरातील  इंग्रजी, मराठी वृत्तपत्रात 1991 मध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक काम सुरु केले. त्यानंतर ब्युरो चीफ, प्रोजेक्‍ट मॅनेजर अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2003 मध्ये प्रिंट मिडियातून इलेक्‍ट्रॉनिककडे वळलो. एनडीटीव्हीचा पश्‍चिम महाराष्ट्‌ प्रतिनीधी म्हणून पुण्यातून काम करत स्थायिक झालो. 
अकरा वर्ष पत्रकारिता केली, कामाचा उबग आला आणि सप्टेंबर 2014 मध्ये पत्रकारितेला रामराम ठोकला.

 तीन महिन्याच्या ब्रेकनंतर पुण्याच्या सिम्बायोसीस कॉलेजमध्ये नव्या पिढीला पत्रकारितेचे धडे देण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला, पण नशिबात वेगळंच होतं. एनडी टीव्हीचा राजीनामा देऊन औरंगाबादेत तीन महिन्यासाठी मुक्कामी आलो, शहरावर इलेक्‍शन फिवर चांगलाच चढला होता. मलाही त्याची लागण झाली. सत्ताधारी कॉग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्यासाठी मुस्लिम समाज नव्या पर्यायाच्या शोधात होता.

 नांदेड-वाघाळा महापालिकेत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लीमीनने (एमआयएम ) घवघवीत यश मिळवले होते, एमआयएम नावांच वादळ महाराष्ट्रात घोंगावणार याचा अंदाज राजकीय धुरीणांनी बांधला होता. ओवेसी बंधुची आक्रमक  भाषा मुस्लिम तरुणांना खुणावत होती. पत्रकारिता करत असतांना ओवेसी बंधूंच्या संपर्कात आलो होतो. औरंगाबाद मध्य मतदार संघासाठी उमेदवाराची शोधाशोध सुरु होती. एमआयएमच्या कॉर्नर बैठकांना मी ही जायला लागलो. 

 चांगल्या, उच्चशिक्षित मुस्लीम तरुणांनी राजकारणात यायला हंव असे आवाहन एका बैठकीत करत असतांनाच एक कार्यकर्ता उठला, आणि तुम्हीच का निवडणूकीला उभे राहत नाही असा सवाल केला? सगळ्यांनीच आग्रह धरला. हैद्राबादहून आलेल्या टीमने मुलाखत घेतली. बावीस दिवस निवडणूकीला शिल्लक असतांना उमेदवारीची माळ गळ्यात पडली आणि प्रचाराला लागलो. 

वीस हजार मतांनी विजय 
सत्ताधारी कॉग्रेस आघाडी सरकारकडून मुस्लीम समाजाचा केवळ वोट बॅंक म्हणून वापर केला गेला, याची प्रचंड चीड समाजात होती. एमआयएमचा सशक्त पर्याय उपलब्ध असल्याने मुस्लीम एकवटला आणि अशक्‍यप्राय विजय मिळाला. निवडून येण्यापेक्षाही मुस्लीम समाजासाठी प्लॅटफॉर्म तयार करणं माझ्यासाठी महत्वाच होत. नशीबाने साथ दिली, पहिल्याच फटक्‍यात आमदार झालो.

तीन साडेतीन  वर्षात सर्व जाती धर्मातील गोर-गरीबांची काम करता आली. माझ संपर्क कार्यालय नेहमी भरलेलं असत. घेऊन आलेले प्रश्‍न सुटल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे पाहून माझे आमदार होणे सार्थकी लागल्याचा आनंद होतो. शहराचा विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी कोणत्याही पक्षाची साथ घ्यायला तयार आहे. रस्त्यांचा प्रश्‍न प्रामुख्याने सोडवण्यावर माझा भर आहे. पाच वर्ष प्रामाणिकपणे लोकांची कामे करत राहणार, पुढे माझे काय करायचे हे जनताच ठरवेल. 

ग्रेट ब्रिटनच्या  कौन्सलेटकडून फ्यूचर लिडरशीप शोधण्यासाठी देशात सर्व्हे करण्यात आला होता. निवड झालेल्या सदस्यांचा लंडन येथे अभ्यास दौरा झाला . यासाठी हिंदूस्थानातून निवड झालेल्या 12 सदस्यांपैकी महाराष्ट्रातून एकमेव माझी निवड करण्यात आली हा केवळ माझाच नव्हे तर संपुर्ण राज्याचा बहुमान असल्याचे मी समजतो." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT