Imtiaj_Jaleel_MLA
Imtiaj_Jaleel_MLA 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा रेल्वे विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा : इम्तियाज जलील

जगदीश पानसरे

औरंगाबादः मराठवाडा रेल्वेच्या वर्षानुवर्ष रखडलेल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतांनाच मराठवाडा रेल्वे विकासासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या धरतीवर मराठवाडा रेल्वे महामंडळ स्थापन करा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. नांदेड येथे दक्षिण-मध्य रेल्वे विभागाच्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली.

मराठवाड्यासह दक्षिण-मध्य रेल्वे विभागात येणाऱ्या जिल्ह्यातील रेल्वे प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी नांदेड विभागीय कार्यालयात अकरा खासदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या बैठकीत मराठवाडा व औरंगाबाद रेल्वेचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागले नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतांनाच दक्षिण मध्य रेल्वे मराठवाड्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही केला.

इम्तियाज जलील सरकारनामाशी बोलतांना म्हणाले, मराठवाडा व औंरगाबाद जिल्ह्यातील रेल्वे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासू कायम आहेत, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, दुहेरीकरण, मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्याचे काम, पीटलाईन या मागण्या सातत्याने केल्या जातात, मात्र त्यावर रेल्वेकडून कुठलाच निर्णय घेतला जात नाही. परिणामी रेल्वेंची संख्या, विस्तार ठप्प झाला आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेचे अधिकारी आम्हाला ग्रहित धरत असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद आंदोलनाच्या माध्यमातून निश्‍चितच दाखवून देऊ. जिल्ह्यातील रेल्वे प्रश्‍न आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधा संदर्भातील एक सविस्तर यादी मी आजच्या बैठकीत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांना दिली आहे. येत्या काळात त्यावर काय कारवाई होते याकडे माझे लक्ष असणार आहे. नेहमीप्रमाणे रेल्वे विभागाने या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले तर मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन आणि रेल रोको आंदोलन करण्याची देखील माझी तयारी आहे, तसा इशाराच मी संबंधितांना दिला आहे.

या आहेत मागण्या

-औरंगाबाद- चाळीसगांव, औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करा
- औरंगाबादहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या महत्वाच्या रेल्वे गाड्यांना मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात थांबा द्या
- मुंबई-मनमाड राजाराणी एक्‍स्प्रेस औरंगाबादपर्यंत वाढवा
- जनशताब्दी एक्‍स्प्रेस गाडी दादर ऐवजी व्हीटीपर्यंत करा
- औरंगाबादेतून बंगलोर, गोवा, जयपूर, सुरत, कोलकाता, लखनऊ, अहमदाबाद शहरांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा सुरू करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT