jaydatta-Kshirsagar-
jaydatta-Kshirsagar- 
छत्रपती संभाजीनगर

जयदत्त क्षीरसागर यांच्या 'चष्म्या'तून दिसते घड्याळ आणि कमळही !

Dattatrya Deshmukh

बीड : जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकाराने बीड येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर झाले . शस्त्रक्रिया  झालेल्या रुग्णांना त्यांच्या हस्ते चार दिवसांपूर्वी चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याचे फोटो खुद्द क्षीरसागरांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले .

 नेटीजन्सनी क्षीरसागर यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरील प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत . एका नेटीझनने अशी कॉमेंट केलीय की तुम्ही दिलेल्या  ‘चष्म्यातून कमळही दिसतेय अन॒ घड्याळही’ !. 

जयदत्त क्षीरसागरांची  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी एका बाजूला जवळीक  वाढलेली  दिसतेय . तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांना ते आवर्जून हजर असल्याचे दिसते .  स्थानिक स्वराज्य  संस्था निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेमुळे आता त्यांची   पावले भाजपकडे वळत असल्याचे जाणवत असल्याचे  अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. त्याचवेळी   पुन्हा ते शरद पवारांच्या उपस्थितीतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमालाही ते व्यासपीठावर हजर राहतात. त्यांच्या या खेळ्या पक्षांतर्गत विरोधकांना बुचकळ्यात टाकत आहेत आणि समर्थकांनाही संभ्रमित करत आहेत.

राष्ट्रवादीतले बडे प्रस्थ असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मागच्या वर्षभरापासून पक्षांतर्गत कुरघोड्यांचा सामना करावा लागत आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांचे बंड तर पक्षांतर्गत विरोधकांसाठी नामी संधीच ठरली. संदीप क्षीरसागर यांना बळ देऊन जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यक्रमापासूनही त्यांना ‘बायपास’ करण्यात आले. विशेष म्हणजे पक्षाच्या जिल्हा संघटनेतही त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. 

मात्र, क्षीरसागरांनी ‘दिस जातील, भोग सरल, सुख येईल’ या ओळीप्रमाणे संयम ठेवत योग्य वेळेची वाट पाहीली. पण, याच काळात जिल्ह्याच्या बाहेर होणाऱ्या विरोधकांची संघर्ष यात्रा, पक्षाचा हल्लाबोल अशा कार्यक्रमांना त्यांची हजेरी लावणारे क्षीरसागर कधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या संपर्कात तर कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातही असत. त्यामुळे क्षीरसागरांचे चाललेय काय, याचे कोडे कायम असायचे. 

त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अचानक चहापानाला बोलविले आणि ‘क्षीरसागर पक्षाचेच आहेत, ते वेगळा निर्णय घेणार नाहीत’ अशी त्यांच्याबाबत पक्षाने प्रथमच अधिकृत प्रतिक्रीया दिली. पुढेही विविध कारणांनी त्यांची भाजपनेत्यांची संपर्क मोहिम जोरातच होती. रस्ता कामांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटलेल्या क्षीरसागरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिल्ली येथील तैलिक साहू महासभेच्या एकता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रीत केले. 

दरम्यानच्याच काळात झालेल्या लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुक प्रक्रीयेपासून त्यांना पुन्हा पक्षांतर्गत विरोधकांनी दुर ठेवल्याचा आणि गेल्या वर्षभरातील राजकीय अपमानाचा ‘हिशोब’ त्यांनी मतदानात पुर्ण केला, असे बोलले जाते .

निकालानंतर त्यांच्या समर्थकांना आलेले आनंदाचे भरते आणि भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी निकालाच्या काही तासांनीच बीड पालिकेला भेट दिल्यानंतर त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी खेळलेल्या विजयाच्या गुलालामुळे या निवडणुकीतील आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच झाले.

 या निवडणुकीतली भूमिका आणि भाजप नेत्यांशी वाढलेला संपर्क यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची पावले भाजपच्या दिशेने वळत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसे, क्षीरसागरांनी पक्षातून जावेच यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनाही या घटनांमुळे हायसे वाटू लागले.

मात्र, याच काळात पुण्यात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेला उपस्थित राहणारे जयदत्त क्षीरसागर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ मोहिमेच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर हजर होते. त्यांच्या या दुहेरी खेळीने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. विशेष म्हणजे एकाच रांगेत बसलेले पक्षाचे नेते अजित पवार व जयदत्त क्षीरसागर यांच्यात हास्यविनोद सुरु असल्याचे फोटो त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का देणारे आहेत .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT