Satish Chavan Campaining news
Satish Chavan Campaining news 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडी, पण काॅंग्रेस प्रचारापासून अलिप्तच..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसने तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेना- काॅंग्रेसचाही पाठिंबा चव्हाण यांना मिळाला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रचाराला लागले असले तरी काॅंग्रेस मात्र यापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण यांनी यापुर्वी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी-काॅंग्रेस आघाडीकडून त्यांनी २००८ आणि २०१४ मध्ये विजय मिळवत भाजपचा पराभव केला होता. आता तिसऱ्यांदा ते मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आज जरी त्यांचे पारडे जड दिसत असले तरी प्रत्यक्षात प्रचार मात्र शिवसेना-राष्ट्रवादी हे दोनच पक्ष करतांना दिसत आहेत.

सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना हजेरी लावण्याचा सोपस्कार पार पाडल्यानंतर काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारातून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. चव्हाण यांच्या बॅनरवर काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीचा फोटो असला तरी प्रचारात मात्र त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसत नाहीयेत.

या उलट शिवसेनेने मात्र सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीत काय झाले?  हे सगळे विसरून चव्हाण यांच्यासाठी मतदारांना आवाहन करायला सुरूवात केली आहे. मेळावे, बैठकांमधून शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील महाविकास आघाडीचा धर्म पाळतांना दिसत आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये काॅंग्रेसला मानणारा मोठा मतदार असल्याने काॅंग्रेस प्रचारापासून अलिप्त राहणे सतीश चव्हाण यांना न परवडणारे आहे. तर शिवसेना नेते खैरे यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले असले तरी लोकसभा निवडणुकीत खैरेंच्या विरोधात चव्हाण यांनी मागितलेली उमेदवारी, वीस वर्षात खैरेंनी केलेली वीस कामे सांगा, असे दिलेले आवाहन खैरे आणि त्यांचे समर्थक विसरतील का? याबद्दल देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT