Duck news georai
Duck news georai 
छत्रपती संभाजीनगर

माजलगावच्या डकांचा गेवराईत सत्कार; भावी उमेदवार म्हणून दिल्या शुभेच्छा..

दत्ता देशमुख

बीड : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन सभापती अशोक डक यांची माजलगाव ही जन्मभूमी व राजकीय कर्मभूमी असतानाही त्यांचा पहिला नागरी सत्कार गेवराईत पार पडला. भाषणांत नेत्यांनी अशोक डकांचा उल्लेख माजलगावचे राष्ट्रवादीचे भावी उमेदवार असाच केला. त्यामुळे आता भविष्यात काय काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक डक यांच्या माध्यमातून जिल्ह्याला प्रतिष्ठेचे मानले जाणारे व आशिया खंडातील सर्वात मोठी पणन संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने गेवराईत नागरी सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देतांना डक म्हणाले, सामान्यांना पदावर बसविण्याची धमक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यातच आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यामुळे सन्मान मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमरसिंह पंडित यांच्या पुढाकाराने सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे सिंदफणा नदीवर उभारल्या गेलेल्या बंधाऱ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड होऊन फळपिकांचे उत्पादन वाढले आहे. या फळपिकांना मुंबईत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याचेही डक म्हणाले.

दरम्यान, अशोक डक यांची जन्मभूमी व राजकीय कर्मभूमी माजलगाव तालुका आहे. त्यामुळे अशा प्रतिष्ठेच्या पदावर बसल्याने त्यांचा नागरी सत्कार माजलगावात होणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सोळंकेंनी थेट पक्षावर आगपखाड करत राजीनाम्याची धमकी दिली होती. नंतर त्यांनी हे अस्त्र म्यान केले. मात्र, डकांना पवारांनी सुरुवातीला या बाजार समितीचे संचालक आणि पुन्हा थेट अध्यक्ष करुन सोळंकेंना प्रतिस्पर्धीच तयार करुन ठेवल्याचे मानले जात आहे.

कदाचित त्यामुळेच त्यांच्या निवडीचा फारसा आनंद माजलगावात झाला नसावा.
पण, विजयसिंह पंडित यांनी मात्र त्यांचा पहिला नागरी सत्कार करुन सन्मान केला. यावेळी अनेक नेत्यांच्या भाषणात अशोक डकांचा उल्लेख माजलगावचे राष्ट्रवादीचे भावी उमेदवार असाही झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT