MLA Ambadas Danve voices worry about Missing Women
MLA Ambadas Danve voices worry about Missing Women 
छत्रपती संभाजीनगर

बेपत्ता महिलांचा शोध न लागल्यानेच अत्याचाराच्या घटना वाढल्या- अंबादास दानवे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील विविध भागातून बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध लावण्यात पोलीस खात्याला यश न आल्यामुळेच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून या संदर्भात गृहविभागाने ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्‍था मतदारसंघाचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली.

महिलांवरील वाढते अत्याचार या विषयावरील चर्चेत सहभागी होतांना आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष एका महत्वाच्या मुद्याकडे वेधले. अंबादास दानवे म्हणाले, ''राज्यात महिलांवरील वाढत्या अत्यांचाराच्या घटनांमागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे बेपत्ता महिलांचा शोध न लागले. राज्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात, पण त्याचा तपास योग्य पध्दतीने केला जात नाही.''

''औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंभर ते सव्वाशे महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. परंतु यापैकी एकाही महिलेचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. महिने, वर्ष उलटून जातात तरी बेपत्ता महिलांचा तपास लागत नाही, आणि यातूनच पुढे कुठे तरी महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात,'' असे ते म्हणाले. 

बेपत्ता महिलांची तक्रार पोलीसांत दाखल झाल्यानंतर त्यांचा गांभीर्याने तपास केला गेला तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसण्यास निश्चितच मदत होईल. सरकार या संदर्भात ठोस कारवाई करणार का? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. दानवे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुली आणि महिलांवरील अत्यचाराचा मुद्दा उपस्‍थित केला होता.

या प्रश्नाला उत्तर देतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेपत्ता महिलांचा शोध घेऊन तपास पूर्ण करण्यासाठी शासन निश्चितच गंभीर असून या कामात आणखी गती आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT