MLA Dheeraj Deshmukh Appeals to Latur People
MLA Dheeraj Deshmukh Appeals to Latur People 
छत्रपती संभाजीनगर

पोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख

सुशांत सांगवे

लातूर : ''मी हात जोडून पून्हपून्हा विनंती करतो, प्रत्येकाने घरात बसून रहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. ‘कोरोना’चा फैलाव होईल अशी कुठलीही घोडचूक करून नका. कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नका. अधिक गंभीर व्हा. आपल्यावर आलेल्या या संकटावर घरात बसून मात करा. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या घरातील एक सदस्य या नात्याने मी आपल्याला हे कळकळीचे आवाहन करत आहे,'' अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी लातूरकरांशी संवाद साधला.

घरात बसून रहा, या सूचनेचे मी तंतोतत पालन करत आहे, असे सांगत देशमुख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांशी संवाद साधायला सुरवात केली. ते म्हणाले, ''कोरोन अद्याप आपल्या जिल्ह्यात शिरला नाही. तो शिरणार नाही, याची जबाबदारी तुम्हाला-आम्हाला घ्यायची आहे. आपण घरात बसून राहीलो, तरच आपल्याला ‘कोरोना’वर मात करता येईल. आपले कुटूंब, आपला परिसर, आपला जिल्हा ‘कोरोना’मुक्त ठेवता येईल.''

''ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असतील तर तातडीने वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. साधा आजार असला तरी घराबाहेर पडू नये. स्वत:हून होम क्वारंटाईमध्ये रहावे. संचारबंदी लागू होण्याआधी पुण्या-मुंबईहून अनेकजण लातूरात परत आले आहेत. ते आपलेच नागरिक आहेत. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू नका. बाहेरून आलेल्यांमध्ये ‘कोरोना’सारखी लक्षणे असतील तर त्यांनीही तातडीने योग्य ते उपचार घ्यावेत. सरकार, प्रशासनाकडून सांगितल्या जाणाऱ्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. काहींनी अजूनही ‘कोरोना’ला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही,'' असे करून चालणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, ''सध्या पोलिसांची सक्ती, प्रशासनाची सक्ती पहायला मिळत आहे. प्रत्येकजण घराबाहेर पडू नका, असे सांगत आहेत. पोलिसांची काळजी ही आपल्या प्रत्येकाच्या आईसारखीच आहे, असे समजून त्यांना सहकार्य करा. यात पोलिसांचा कसलाही फायदा नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठीच ‘घरी बसा’, असे सांगत आहेत. एकाला कोरोना झाला तर अख्खे गाव, तालूका, जिल्हा ‘कोरोना’च्या सावटाखाली येईल. त्यामुळे आत्ताच घरी बसून राहणे गरजेचे आहे,''

आपण सगळेच एका स्पीडने जीवन जगत होतो. या भरधाव वाहनाच्या खिडकीतून आपल्याला बाहेरचे दृष्य स्पष्ट दिसत नव्हते. पण, आता वेग मंदावला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण आपण अनुभवायला हवे. कुटूबांसोबत रहायला हवे. वेगवेगळे छंद जोपासायला हवेत. हेच आयुष्यातील खरे सौंदर्य आहे.
- धीरज देशमुख, आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT